दैनिक स्थैर्य | दि. 15 डिसेंबर 2024 | सातारा | कन्याशाळा सातारा येथील मैदानावर खेळत असताना अक्षदा विजय देशमुख या मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी शुक्रवारी शाळेस भेट देवून याबाबतचा अहवाल माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांना सादर केला आहे.
कन्याशाळेच्या मैदानावर कब्बडी खेळत असताना अक्षदा देशमुख ही विद्यार्थीनी पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच जिल्हा रूग्णालयात उपचारास दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने एकच खळबळ उडाली.
याघटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पंचायत समिती शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांनी गुरुवारी शाळेला भेट देवून माहिती घेतली.
त्यानंतर शुक्रवारी गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे यांनी कन्याशाळेस सकाळी भेट दिली. शाळेच्या” मुख्याध्यापकासह शाळा व्यवस्थापनाकडून याबाबतची माहिती जाणून घेतली.
या भेटीबाबतचा 2 अहवाल त्यांनी तयार करुन तो अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांच्याकडे सादर केला आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी शाळा व्यवस्थापनावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.