दैनिक स्थैर्य | दि. २७ जुलै २०२३ | फलटण |
अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था फलटण केंद्राचा विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती प्रदान कार्यक्रम नवलबाई मंगल कार्यालय, फलटण येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माजी नगरसेविका सौ. मेधा सहस्रबुध्दे होत्या, तर अध्यक्षस्थानी श्रीमती वसुधा देशपांडे होत्या.
प्रारंभी या संघटनेचे अध्यक्ष विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. उपाध्यक्ष वैभव विष्णुप्रद यांनी या संस्थेचा दरवर्षी पार पाडण्यात येणार्या कार्यक्रमांचा धावता आढावा घेतला.
यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोख बक्षीस, शालेय कीट देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये शर्वरी वेलणकर, आदित्य कुलकर्णी, स्वानंदी रानडे, ऋचा गरवारे तसेच अद्रता कुलकर्णी, अश्लेषा आठल्ये, वैष्णवी देशपांडे यांना शिष्यवृत्ती रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कैलासवासी सौ. स्नेहलता बुधकर यांच्या स्मरणार्थ अरुण बुधकर (पुणे) यांनी या संस्थेला ५० हजारांची देणगी प्रदान केली. यावेळी देणगीदार यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमातील प्रमुख पाहुण्यांची ओळख व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल केसकर यांनी केले तर आभार सचिन कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमास संघटनेचे सभासद, निमंत्रित व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.