प्रतापगडावर अखंड यज्ञ, सत्संग, कीर्तन महोत्सवाचे आयोजन


स्थैर्य, सातारा, दि. 16 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील ऐतिहासिक प्रतापगडावर धार्मिक-सांस्कृतिक वातावरण निर्माण होणार आहे. वैदिक हिंदू वारकरी बहुउद्देशीय सेवा संघ, महाराष्ट्र उपाख्य राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्यावतीने अखंड यज्ञ, सत्संग तसेच शास्त्र प्रदर्शन व कीर्तन महोत्सव या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा 18 सप्टें बर 2025 ते 20 सप्टेंबर 2025 या कालावधीत तीन दिवस संपन्न होणार आहे.

प्रतापगड या ऐतिहासिक गडावर होणारा हा महोत्सव धार्मिक वातावरणासोबतच सामाजिक एकात्मतेचाही संदेश देणार आहे. देव, देश, धर्म, संत आणि शास्त्र यांची सांगड घालून समाजात ऐक्य, श्रद्धा आणि नीतिमूल्ये दृढ करण्याचे उद्दिष्ट आयोजकांनी स्पष्ट केले आहे. या भव्य धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन धर्म, संस्कृती व संतवाड्मयाच्या तेजोमय परंपरेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतापगडाच्या पायथ्याशी भाविकांचा मोठा जनसागर लोटणार असून, सातारा जिल्ह्यातील हा महोत्सव एक धार्मिक-सांस्कृतिक पर्व ठरणार आहे.

या सोहळ्याचे आयोजन श्रीमंत छत्रपती उदयराजे भोसले यांच्या प्रेरणेने आणि राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. महोत्सवाला महाराष्ट्रभरातील वारकरी संप्रदायातील कीर्तनकार, प्रवचनकार, भजन मंडळे तसेच संत साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.संत साहित्याचा प्रसार, तसेच हिंदू संस्कृती, धर्म आणि अध्यात्माचे विविध आयाम उलगडणारे कार्यक्रम आयोजित करण्यातआले आहेत. संतवाणीवर आधारित प्रवचन, शास्त्रांचे प्रदर्शन, तसेच प्रबोधनपर कीर्तनांच्या माध्यमातून समाजप्रबोधन साधले जाणार आहे.

महोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये
अखंड यज्ञ व सत्संग तीन दिवस सातत्याने मंत्रोच्चार व आध्यात्मिक साधना. शास्त्र प्रदर्शन : धर्मग्रंथ, संतवाङ्मय व भारतीय संस्कृतीचा ऐतिहासिक परिचय. कीर्तन महोत्सव : संत परंपरेतील कीर्तनकारांची प्रेरणादायी कीर्तने.


Back to top button
Don`t copy text!