दैनिक स्थैर्य | दि. १३ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
साखरवाडी, ता. फलटण येथील सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सासुरवाडीवर, श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजाच्या आजोळ असणार्या राजघराण्याच्या वंशजांवर जी टीका केली आहे, ती पवार आणि ‘दादा’ या बिरुदावलीला शोभणारी नाही. त्यामुळे तुम्ही श्रीमंत रामराजे आणि अखंड नाईक-निंबाळकर राजघराण्याची तसेच सोबतच्या बारा बलुतेदारांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी श्रीमंत रामराजे यांचे कट्टर कार्यकर्ते प्रीतसिंह खानविलकर यांनी पत्राद्वारे अजित पवार यांच्याकडे केली आहे.
खानविलकर यांनी पत्रात म्हटले आहे की, आम्ही पवार घराण्याशी एकनिष्ठ असणारे आणि एकसंध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे सामान्य कार्यकर्ते आहोत. तुम्ही आणि शरद पवार साहेब आमच्यासाठी आजही एकच आहात. आज कपटी आणि पेशव्यांची संस्कृती रुजवणार्या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला सध्या विळखा घातला आहे, हे कोणतंही शेंबड पोरगं सांगू शकेल. या निवडणुकीनंतर या विळख्यातून खुद्द शरद पवार साहेब तुम्हाला बाहेर काढतील, याची आम्हाला खात्री आहे.
भाजपच्या कपटी भावनेचा परिपाक म्हणून की काय आज तुमच्याच पार्टीत असणार्या एका ज्येष्ठ नेत्याला म्हणजेच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना तुम्ही ‘श्रीमंत’ म्हणून हिणवले. याबाबत श्रीमंत रामराजे यांना यत्किंचितही वाईट वाटले नसेल. तुमची टीका ऐकत असताना ते हसत असतील, एवढ्या दिलदार मनाचा आणि मोठे हृदय असणारा आमचा राजा आहे आणि का नसणार? घरंदाज राजघराण्याचे संस्कार त्यांच्यावर आहेत.
पण, दादा तुमच्यावर तुमच्याच नेत्यांना दुखावण्याची ही वेळ का आली? याच कधी आत्मचिंतन केलं आहे का? याचं एकदा आत्मचिंतन करा. आमचंच उदाहरण समोर घ्या. आम्ही तुम्हाला सांगत होतो माढा आपल्याकडे घ्या. पण, तुमची दिल्लीतली ताकद आणि वजन तिथे कमी पडले. तुम्हाला माढा आपल्याकडे घेता आला नाही. पर्यायाने नंतरच सगळं रामायण घडलं. जर माढा आपल्याकडे आला असता तर आज चित्र वेगळे दिसले असते. असो, तुमच्या क्षमतेवर बोट ठेवणारे आम्ही पामर कोण? असंही तुम्हाला वाटत असेल. वाटत जरी असलं तरी वाटू दे, त्याबद्दल आमच्या मनात कोणतीही क्षमायाचना नाही. कारण तुम्ही काल बोलला ते चुकीचंच होत. त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या हे मात्र निश्चित, असे प्रीतसिंह खानविलकर यांनी पत्रात म्हटले आहे.