अजित पवारांचे पुण्यातील नियोजित कार्यक्रम रद्द, भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२३ । मुंबई । राज्याच्या राजकारणात पडद्यामागून बऱ्याच हालचाली सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नावाच्या सातत्याने वावड्या उठत आहेत. नागपूरात रविवारी झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेनंतर अजित पवार रात्री उशिरा नवी मुंबईच्या एमजीएम रुग्णालयात श्रीसेवकांची विचारपूस करण्यासाठी पोहचले. त्याठिकाणाहून अजितदादा पुण्याला न जाता थेट मुंबईतील त्यांच्या देवगिरी बंगल्यावर गेले.

पुण्यात आज अजित पवारांचे नियोजित कार्यक्रम होते. परंतु पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. त्यातच दुसरीकडे भाजपाचे २ प्रमुख नेते दिल्लीला गेले आहेत. अमित शाह २ दिवसीय मुंबई दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते अचानक दिल्लीला का गेले असाही प्रश्न विचारला जात आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार हे दिल्ली दौऱ्यावर गेले  आहेत.

अजित पवारांचा पुणे दौरा कसा होता?
सकाळी ९.३० वाजता – वडकी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्धाटन
सकाळी ९.४५ वाजता – दिवे येथून मोटार सायकल रॅली
सकाळी १०.१५ वाजता – मौजे वनपुरी येथील नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्धाटन
सकाळी १०.४५ वाजता – मौजे भिवरी, जिल्हा परिषद पुणे साठवण बंधारा भूमिपूजन
पुणे – सासवड रस्ता ते पुणे सातारा हायवे जोड रस्त्याचे पूजन
हॉटेल आमराई ६९ रिसोर्ट उद्धाटन
हॉटेल सुभेदार वाडा उद्धाटन
सकाळी ११.२० वाजता – वाघिरे महाविद्यालयात राखीव वेळ
सकाळी ११.३० वाजता – शेतकरी आणि युवक मेळावा, सासवड

अजित पवार हे वेळेचं बंधन पाळणारे नेते आहेत. अनेक ठिकाणी ते वेळेच्या पूर्वीच हजर होतात. मात्र दादांनी पुणे दौरा रद्द केल्याने अनेक चर्चा होत आहे. दौरा रद्द होणे हे नवे नसले तरी गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहिल्या तर अजित पवारांच्या मनात नक्की काय चाललंय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मागच्यावेळीही अजित पवार यांचा पुणे दौरा रद्द झाला, ते नॉट रिचेबल झाले तेव्हा प्रकृतीच्या कारणास्तव ते बाहेर आले नाहीत असं सांगण्यात आले. मात्र आज नियोजित कार्यक्रम रद्द केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

कुटुंबाला केले जातेय टार्गेट
राऊत यांनी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) मुखपत्रात रविवारी असे लिहिले की, उद्धव ठाकरेंसोबत मी शरद पवार यांना भेटलो. तेव्हा पवार हे ठाकरेंना म्हणाले की, कोणालाही मनापासून सोडून जायचे नाही. पण कुटुंबाला टार्गेट केले जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे पण पक्ष म्हणून भाजपबरोबर जाण्याचा निर्णय आम्ही घेणार नाही असं विधान शरद पवार यांनी केले होते.


Back to top button
Don`t copy text!