दैनिक स्थैर्य । दि. २८ एप्रिल २०२३ । मुंबई । गेल्या काही दिवसांपासून अजित पवार नाराज असून, लवकरच भाजप प्रवेश करतील, असा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. अजित पवार यांनी अनेकदा यावर स्पष्टीकरण देत खुलासे केले आहेत. मात्र, तरीही यावर चर्चा होताना दिसत आहेत. यातच आता. उद्या अजित पवारच काय शरद पवार यांनीही भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांचेही स्वागत असेल, असे मत भाजप नेत्यांनी व्यक्त केले आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्याचे सांगितले जात आहे.
भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात विधान केले आहे. भाजप हा या देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा पक्ष आहे. या विकासाच्या प्रक्रियेत ज्या ज्या लोकांनी भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली, त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेण्याची भूमिका असते, असे सांगत सुधीर मुनगंटीवार यांनी भविष्यात राष्ट्रवादीसोबत एकत्र येण्यास भाजपला कोणताही अडचण नसल्याचे संकेत दिले.
राज्यातील मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील
राज्यातील मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे कायम राहतील, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही नवा बदल अपेक्षित नाही. कधी कधी वेगळी हवा, धुके पसरते. या धुक्याच्या मागे काहीतरी अघटित घडते, असे आपल्याला वाटते. हे एक राजकीय धुके आहे. हे धुके दोन-तीन दिवसांत दूर होईल, तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईल. २०२४ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यात नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवली जाईल. ही गोष्ट आमच्या पक्षाचे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर या मुद्द्यावर फार बोलण्यात अर्थ नाही, असे सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. ते टीव्ही ९शी बोलत होते.
दरम्यान, अजित पवार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची काय चर्चा झाली हे मला माहिती नाही. अजितदादाच त्यावर अधिक बोलू शकतील. या देशाच्या विकासासाठी, प्रगतीसाठी ज्या ज्या लोकांनी इच्छा व्यक्त केली, भाजपला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. त्या सगळ्यांना पक्षात सामावून घेतले जाते. भाजप हा काही एका कुटुंबापुरता मर्यादित असलेला पक्ष नाही. त्यामुळे अजित पवार आमच्यासोबत आले तर स्वागत करणार का हा प्रश्न असेल तर, मी सांगेन की, उद्या शरद पवारही भाजपमध्ये आले, ते येणार नाहीत, पण ते भाजपला पाठिंबा द्यायला तयार झाले किंवा उद्या जयंत पाटील भाजपमध्ये येणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागतच करू, असे ते म्हणाले.