“अजित पवार NDAच्या बैठकीला उपस्थित राहणार” – प्रफुल्ल पटेल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२३ । मुंबई । सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून हळूहळू मोठ्या प्रमाणात तयारी होताना दिसत आहे. भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू असून, विरोधकांच्या खेळीला उत्तर देण्यासाठी आता एनडीएकडूनही एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्ष आपआपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत. १८ जुलैरोजी एनडीएची नवी दिल्लीत बैठक होत आहे. एनडीएची बैठक भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात सहकारी पक्षांशिवाय भाजपने नवीन मित्रपक्षांना आणि माजी सहकाऱ्यांनाही आमंत्रित केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

एनडीएच्‍या बैठकीला अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी माहिती दिली. दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला अजित पवार आणि मी उपस्थित राहणार असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. दुसरीकडे, मंगळवारी सायंकाळी होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला ३८ पक्षांनी आपला सहभाग निश्चित केला आहे, अशी महत्त्वाची माहिती भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी दिली आहे.

दरम्यान, विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ठाकरे गटाच्या वतीने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंगळुरू येथे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तर, शरद पवार हेही मंगळवारी बंगळुरूला जातील, असे सांगितले जात आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, मी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी बोललो असून ते विरोधी पक्षांच्या बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!