अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, ‘सारथी’ प्रश्नी बैठकीला येण्याची विनंती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, 08 : पुण्यातील सारथी संस्थेवरून वाद पेटला आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यामुळे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता राज्य सरकारकडून या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावली आहे. खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी संभाजीराजेंना फोन केला आहे.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. बैठकीत सारथी संस्थेच्या वादावर चर्चा झाली. सारथी संस्थेच्या वादावर तोडगा काढण्यासाठी उद्या गुरुवारी मुंबई बैठक आयोजित करण्यात आली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना फोन करून उद्या होणाऱ्या या बैठकीला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

सारथी संस्थेच्या वादात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी ‘मी ओबीसी असल्यामुळेच मराठा क्रांती मोर्चा माझा विरोध करतं आहे, जर असे राजकारण होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडून पदभार काढून घ्यावा’ असं वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केलं होतं. वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर संभाजीराजे यांनी नापसंती व्यक्त केली होती.

‘मराठा विरुद्ध ओबीसी असा नवीन वाद लावण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. ज्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजाला न्याय देत एकत्र आणले, त्यांच्या नावाने अस्तित्वात आलेल्या या संस्थेला आणि त्या आडून मराठा समाजाला अश्या पद्धतीने बदनाम करणे योग्य होणार नाही’ असं परखड मत संभाजीराजेंनी व्यक्त केलं होतं.

तसंच, ‘शिव-शाहू- फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील जबाबदार नेत्यांना हे वर्तन शोभणारे नाही, असं म्हणत वडेट्टीवार यांना टोला लगावला होता.

दरम्यान, ‘सारथी संस्थेला निधी द्या, माझ्या कामाबद्दल शंका असेल तर मला संस्थाचा कारभार नको’ अशी उद्विग्नता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. ही भावना आपण मंत्रिमंडळ बैठकीत मांडू अशी भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे आज मंत्रिमंडळाची बैठक होत असून विजय वेडट्टीवार यांच्या भूमिकेडे सर्वांचं लक्ष लागले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!