‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ डिसेंबर २०२१ । मुंबई । “देशाचे संरक्षणदल प्रमुख ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाल्याची बातमी धक्कादायक तितकीच वेदनादायक आहे. जनरल बिपीन रावत यांनी त्यांच्या लष्करीसेवेच्या प्रदीर्घ कारकिर्दीत गाजवलेलं शौर्य, पराक्रम, त्यांची देशभक्ती देशवासियांच्या कायम स्मरणात राहील. युवकांना सैन्यदलात दाखल होण्यासाठी प्रेरणा देईल. जनरल बिपीन रावत यांनी भारतीय लष्कराचे प्रमुख म्हणून देशाची संरक्षणसिद्धता, गौरव वाढवण्यात त्यांनी योगदान दिलं. लष्करप्रमुखपदानंतर तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांची, संरक्षणदलप्रमुख पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली. पहिले संरक्षणदलप्रमुख तिन्ही सैन्यदलांमध्ये सहकार्य, समन्वय वाढवण्याचं काम केलं. प्रदीर्घ लष्करी सेवेत असंख्य लढाया, मोहिमा यशस्वी केल्या. युद्धात आघाडीवर राहून सैन्याचं नेतृत्वं केलं. सहकारी अधिकारी, जवानांचं मनोबल कायम उंच ठेवण्यासाठी प्रयत्नशील त्यांचं नेतृत्वं होतं. त्यांच्यासारख्या भारतमातेच्या वीर सुपुत्राचं झालेलं अपघाती निधन ही देशवासियांच्या मनाला चटका लावणारी, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणणारी घटना आहे. ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत, दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब आणि लष्करी अधिकारी बंधूंना मी वंदन करतो. भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या सर्वांच्या राष्ट्रसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘चीफ ऑफ डिफेन्स’ जनरल बिपीन रावत यांच्यासह दुर्घटनेत मृत्यू पावलेले त्यांचे कुटुंब व अन्य लष्करी अधिकाऱ्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.


Back to top button
Don`t copy text!