फलटणमधील ‘मनोमिलना’मुळे स्थानिक नेत्यांऐवजी थेट अजितदादांसोबत काम करण्यासाठी कार्यकर्ते इच्छुक; तालुक्याच्या राजकारणात नव्या समीकरणांचे संकेत


स्थैर्य, फलटण, दि. 26 सप्टेंबर : फलटण तालुक्यात दोन प्रमुख स्थानिक राजकीय गटांमध्ये सुरू असलेल्या ‘ऐतिहासिक मनोमिलना’च्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. या संभाव्य युतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात असून, उलट ते स्वतःच तालुक्याच्या राजकारणात लक्ष घालण्याच्या तयारीत असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या नव्या शक्यतेमुळे दोन्ही गटांमधील प्रमुख कार्यकर्ते अस्वस्थ झाले असून, ते आपल्या स्थानिक नेत्यांना बगल देऊन थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याच्या विचारात असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, “फलटणचा विकास बारामतीप्रमाणे करण्यासाठी माझ्यावर विश्वास ठेवा,” असे आवाहन करत तत्कालीन स्थानिक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्या याच आश्वासनावर विश्वास ठेवून अनेक मतदारांनी मतदान केले होते. आता जर हे दोन्ही स्थानिक गट एकत्र येणार असतील, तर उपमुख्यमंत्री पवार त्यास पाठिंबा देणार नाहीत, अश्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.

याउलट, दोन्ही गटांतील प्रमुख आणि निष्ठावंत कार्यकर्ते मात्र आपल्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर नाराज असल्याचे चित्र आहे. स्थानिक पातळीवर मनोमिलन करण्याऐवजी, थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास अनेक कार्यकर्ते उत्सुक आहेत. काही कार्यकर्ते तर केवळ मनोमिलनाची अधिकृत घोषणेची वाट पाहत असल्याचे बोलले जात आहे.

या सर्व घडामोडींमुळे फलटणमधील ‘मनोमिलन’ झाल्यास तालुक्यातील दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकत्र येऊन थेट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक नवीन आणि प्रबळ राजकीय गट तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यामुळे फलटणच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या उलथापालथीचे संकेत मिळत आहेत.


Back to top button
Don`t copy text!