स्थैर्य, दि.२: राष्ट्रवादी काँग्रसेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवारांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात ट्वीट केले होते. यामध्ये राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले होते. आता पार्थ यांच्या भूमिकेवर अजित पवारांनी भाष्य केले आहे. ‘मला काय तेवढाच उद्योग नाही, असे म्हणत त्यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले आहे.
पार्थ पवार यांनी मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याचा इशारा दिला असून त्यांच्या या भूमिकेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. बीडमध्ये मराठा आरक्षणासाठी तरुणाने आत्महत्या केल्यानंतर पार्थ पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना त्यांना यासंबंधी विचारण्यात आले यावेळी त्यांनी प्रत्येकाला काय ट्विट करावे याचा अधिकार असतो असं सांगत ही राष्ट्रवादीची भूमिका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘माझी बहीण सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलेय की ही, राष्ट्रवादी काँग्रेसची ती भूमिका नाही. आता अलीकडची मुले काय ट्वीट करतात. मग प्रत्येकवेळी तुम्ही विचारता तुमच्या मुलाने हे ट्वीट केले. तुमच्या मुलाने ते ट्वीट केले. तेवढाच मला उद्योग नाही. मला राज्यात अनेक प्रकारची जबाबदारी असते. असे त्यांच्या शैलीत त्यांनी उत्तर दिले आहे.