स्थैर्य, मुंबई, दि.२२: राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे त्यांनी क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली आहे. मात्र, कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला आहे. पण थोडी ताप थंडी सारखी लक्षणे असल्याने पवारांनी सार्वजनिक कार्यक्रमात न जाण्याचे ठरवले आहे. तसेच आजच्या नियोजित बैठकाही रद्द केल्या आहेत. कालही त्यांनी मंत्रालयातील सर्व बैठका रद्द केल्या होत्या. अशी माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
व्हिसीद्वारे बैठकीला हजर राहणार
असे असले तरी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी शरद पवार यांच्यासोबत वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकांना अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबारही रद्द
अजित पवार बुधवारी मंत्रालयात सुद्धा अनुपस्थितीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना पॅकेज देण्यावर होणार मंत्रिमंडळाची कालची आणि आजची बैठक रद्द झाली आहे. आता शुक्रवारी ही बैठक होणार आहे. तर आजचा राष्ट्रवादी कार्यालयातील जनता दरबार ही पवारांनी रद्द केला आहे.