स्थैर्य ,मुंबई, दि, २९: महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना एक खुलं आव्हान दिलं आहे.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार का याची सध्या चर्चा सुरू आहे. या संदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी देखील राज्य मंत्रिमंडळला एक पत्र पाठवून निवडणूकीबाबत काय भूमिका ठरली आहे, असं विचारलं होतं. याबाबत सरकारकडून अद्यापही उत्तर दिले गेले नाही. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष निवडणुकीची चर्चा झाली नाही.
आता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल यांचे अभिभाषण देखील होणार आहे. तरीही विधानसभा अध्यक्ष निवडणूक याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. मग विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार का, की उपाध्यक्ष यांच्याकडेच याचा अतिरिक्त कार्यभार राहील याची सध्या चर्चा सुरू आहे.
फडणवीसांना खुलं आव्हान
आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभा अध्यक्ष निवडणूक होणार का असे विचारले असता, राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः उत्तर न देता याचे उत्तर अजित पवार देतील असं सांगत अजित पवारांकडे पाहिले. विधानसभेचे संख्याबळ नसल्याने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही का? असा आरोप फडणवीस यांनी केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लावून तर बघा राज्य सरकारवर अविश्वास ठराव आणा मग दाखवतो की नेमके किती आमदार माझ्याबरोबर आणि सरकारबरोबर आहेत, असं खुलं आव्हान अजित पवारांनी फडवणीस यांना दिले.
अधिवेशनाच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुगलबंदी रंगली. त्यामुळे अधिवेशन काळातही विविध मुद्द्यांवरून राज्यातील जनतेला विधीमंडळात राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो.