स्थैर्य, सातारा, दि. २७ : राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे सध्या सरकार आहे. त्यांच्या माध्यमातून माझ्या मतदार संघातील प्रश्न मार्गी लागावेत अशी अपेक्षा माझ्याकडून जनतेची आहे. अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत. सगळयांना माहिती आहे ते कधीच विकासकामामध्ये राजकारण आणत नाहीत. शहराचे, तालुक्याचे प्रश्न मार्गी लावतात, अशी स्पष्टोक्ती भाजपाचे आमदार शिवेंद्रराजेंनी केली. दरम्यान, मतदार संघातील प्रश्न त्यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांच्याकडे मांडले.
साताऱ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा हे आले असता त्यांची शासकीय विश्रामगृहावर भेट घेवून आ. शिवेंद्रराजेंनी प्रश्न मांडले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सातारचे दोन तीन विषय होते. त्या संदर्भात अजितदादांकडे मांडले. महाराष्ट्र स्कूटरचा जो प्रकल्प आहे. त्याबाबत शासनाचा आणि त्यांचा जो निर्णय झाला आहे. त्यानुसार कार्यवाही व्हावी. शासनाच्या मध्यस्तीने महाराष्ट्र स्कूटरचा प्रकल्प सुरु व्हावा. 40 एकर जमीन त्यांच्या ताब्यात आहे. सातारा एमआयडीसीमधील सगळय़ात मोठी जागा महाराष्ट्र स्कूटर, बजाजची आहे. एवढी मोठी जमीन आहे. लोकांना कारखाने उभी करायला जागा मिळत नाही. बजाजने तिथे काहीतरी करावे अन्यथा ती जागा एमआयडीसीला हॅण्डओव्हर करावी. दुसरे कोणीतरी तेथे कारखाना उभा करेल. तेवढीच एमआयडीसीला उभारी मिळेल. दुसरे म्हणजे मासचे जे पदाधिकारी आहेत. त्यांच्यावतीने मागणी करण्यात आली आहे की एमएसईबीने जे फिक्स चार्जेस लावले आहेत. ते रद्द करावेत. अजितदादांनी सांगितले की तुमचं म्हणण मान्य आहे. त्याबाबत योग्य ती कार्यवाही करु, असे आश्वासन दिले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोव्हीड टेस्टिंग सेटंर साताऱ्यात सुरु व्हावे. साताऱ्यात क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय आहे. तेथे मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आहेत. तपासणीसाठी बाहेर जावे लागते. कोरोनाच्या केसेस वाढायला लागल्या आहेत. त्याबाबत मागणी केली आहे. चर्चा करुन निर्णय घेवू असे अजितदादांनी सांगितले. पुढे शिवेंद्रराजे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँक ही शेतकऱ्यांना पिक कर्ज देते. मध्यंतरीच्या काळात महसूल विभागाने अद्यादेश काढला गेल्याने देवस्थानच्या ज्या जमिनी आहेत. त्या जमीनीवर पिक कर्ज द्यायला अडचणी निर्माण होत आहेत. पुर्वी आपण ई करारावर बोजा चढवून पिक कर्ज देता होतो. मध्यंतरी घेतलेल्या निर्णयामुळे पिककर्ज शेतकऱ्यांना मिळत नाही. जावली तालुक्यातील शेतकरी हे जिल्हा बँकेच्या लाभापासून वंचित राहत आहेत. अद्यादेश दुरुस्त करावा. ई कराराबाबत अजितदादांनी सकारात्मकता दाखवली आहे.