दैनिक स्थैर्य | दि. ११ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्षम आहेत. आमचेही ते नेते आहेत. अनेक वर्षे ते अर्थमंत्री राहिले आहेत. मात्र, त्यांच्याकडून बारामतीला जेवढा निधी दिला जातो तेवढा निधी फलटण, इंदापूर, दौंड, पुरंदर तालुक्यांना दिला गेला नाही. निधी देताना ते फक्त स्वत:च्या बारामतीचाच जास्त विचार करतात. बारामतीला नेहमीच झुकते माप त्यांनी दिले. त्यांनी निधी न दिल्यामुळेच फलटणचा विकास बारामतीप्रमाणे झाला नाही. ही वस्तुस्थिती आहे, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केला.
साखरवाडी येथे फलटण – कोरेगाव विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार आ. दिपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. साखरवाडी येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी श्रीमंत रामराजे, संजीवराजे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांना श्रीमंत संजीवराजे व सह्याद्री कदम यांनी उत्तरे दिली. यावेळी शंकरराव माडकर, श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, संचालक रमेश बोंद्रे, अभयसिंह ना. निंबाळकर, सतीश माने उपस्थित होते.
पुढे बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, माझ्या आमदारकीबाबत अजित पवार यांनी केलेले वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून केले आहे. ती राजकीय भाषा असून जनतेने त्याकडे फारसे गांभीर्यान पाहू नये. ते सर्वाधिक निधी बारामतीला देतात इतर तालुक्यांना अत्यंत कमी निधी देतात. निधी देतानाच प्रचंड दुजाभाव केला जातो. त्यांनी बारामतीप्रमाणे फलटणला निधी दिला असता तर फलटणचा विकास बारामतीप्रमाणेच झाला असता, असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे ना. निंबाळकर यांनी व्यक्त केले.
कमिन्स कंपनीवर केलेल्या आरोपांबाबत संजीवराजे म्हणाले की, कमिन्स कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी असून त्यांच्या कर्मचार्यांना मिळणारा पगार डायरेक्ट त्यांच्या खात्यावर जमा होतो. कामगारांच्या पगाराबाबत केले जाणारे आरोप खोटे आहेत. आम्हाला कमी पगार मिळतो असं जे कामगार सांगतात ते नक्कीच कामगार आहेत का? हे तपासावे लागेल, असेही संजीवराजे ना. निंबाळकर म्हणाले.
संजीवराजे पुढे म्हणाले, श्रीराम कारखाना अत्यंत अडचणीत होता खा. शरद पवार यांच्या सहकार्यामुळेच श्रीराम कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं. साखर उद्योगात आपल्याच लोकांना नव्हे तर शरद पवार यांनी सर्वांनाच नेहमीच सहकार्य केले. शेतकर्यांसाठी त्यांची नेहमीच धडपड असते. श्रीराम कारखाना आपण भागीदारी तत्वावर चालवत असून याशिवाय कोणतीही अन्य संस्था कोणालाही चालवायला दिलेली नाही. श्रीराम कारखाना, डिस्ट्रलरी दोन्ही मिळून चार कोटीच्या भाडेतत्त्वावर चालवला जात आहे. शेतकर्यांना अधिकचा ऊस दर मिळण्याबरोबर पूर्वीची देणी संपवणे, हा त्यामागील प्रामाणिक हेतू आहे.
साखरवाडी कारखान्याबाबत केलेल्या वक्तव्यावर बोलताना सह्याद्री कदम म्हणाले की, साखरवाडी कारखाना जेव्हा चिमणराव कदम, विष्णूपंत गाडे, शामराव भोसले यांच्याकडे चालविण्यास होता तेव्हा शेतकर्यांना वेळेवर पेमेंट होत होते, आता तात्यांकडे चालविण्यास आला असताना, आताच पेमेंटच्या अडचणी का व्हायला लागल्या आहेत. आता कुठेतरी फेक नेरेटीव्ह क्रिएट केले जात आहे. कुठेतरी गोंधळ होतोय, संस्था नीट चालत नाहीत, असे आरोप केले जात आहेत. असे काही नाही. उलट आता साखरवाडी कारखान्याचे १० हजार मेट्रिक टन क्रशिंग झाले आहे. आता उलटा कारखाना वाढत चालला आहे. आता शेतकर्यांचा जास्तीत जास्त ऊस गाळप केला जात आहे. हे चांगले चालले आहे. कारखान्यावर केले जाणारे आरोप चुकीचे आहेत. कारखाने, संस्था अगदी व्यवस्थित चालल्या आहेत.
फलटण तालुक्याचा विकास झाला नाही, या अजितदादांनी केलेल्या आरोपावर उत्तर देताना सह्याद्री कदम म्हणाले की, असे काही नाही, विकास बोलून समजत नाही, तर तो दिसत असतो. धोम-बलकवडीचे पाणी २००९-१० साली फलटणला आले. अख्खा तालुका सुजलाम्-सुफलाम् झाला, त्याप्रमाणे कमिन्स आले. त्यामुळे ५ ते ७ हजार लोकांना काम मिळाले. रस्त्यांची सुधारणा हळूहळू होत आहे, सहापदरी हायवे फलटणमधून गेला आहे.