अजिंक्यतारा साखर कारखान्याचा वजन काटा अचूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि १२: अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२०२१ चा ऊस गळीत हंगाम सुरु असून चालू हंगामात शासकीय काटा तपासणी पथकामार्फत कारख्यान्याच्या वजन काट्यांची पडताळणी करण्यात आली. कारखान्यातील १० टनी, ३० टनी, ४० टनी वजन काटे तंतोतंत व अचूक वजन दर्शवत असल्याचा अहवाल या पथकाने दिला असून नेहमीप्रमाणे कारखान्याचे वजन काटे अचूक आहेत, अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे. .

सहायक नियंत्रक वैधमापन शास्त्र आर. एन. गायकवाड, इन्स्पेक्टर ऑफ लीगल मेट्रोलॉजी एस. बी. सावंत व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी अजिंक्यतारा कारखाना कार्यस्थळावर अचानक भेट दिली. यावेळी शेतकरी प्रतिनिधी अमोल जाधव रा. गोवे, प्रकाश पवार रा. नागठाणे हे साक्षीदार म्हणून उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक देसाई, शेती अधिकारी विलास पाटील यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैलगाडी क्र. ३५७२०, ३१६८८, ट्रॅक्टर ट्रॉली क्र. एम.एच. ११ यु. ३२६१, एम.एच. १२ ईक्यू. ४२७३ आदी वाहनांचे फेर वजन करून ते बरोबर असल्याची खात्री करून घेण्यात आली. तसेच वजन काट्यावर २० किलो प्रमाणित वजने ठेवून तपासणी केली. वाहनांमधील ऊसाचे वजन इलेकट्रॉनिक वे- ब्रिज इंडिकेटरला तंतोतंत असल्याचे दिसून आले. संपूर्ण वजन काटे अचूक वजन दाखवत असल्याचे सर्वांसमक्ष आढळून आले. यानंतर तपासणी पथकाने वजन काटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र कारखान्यास दिले.

कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या कुशल नेतृत्वाखाली कामकाज करत असलेल्या अजिंक्यतारा कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी शासनाच्या वैधमापन खात्यामार्फत दरवर्षी नियमितपणे केली जाते. सर्व वजन काटे तंतोतंत वजन दर्शवित असल्याने ऊस वजनाच्या बाबतीत ऊस उत्पादक सभासद, शेतकरी, बिगर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा कारखान्यावर पूर्ण विश्वास आहे, असे कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांनी सांगितले. जिल्ह्यातील कारखान्यांच्या ऊस वजन काट्यांविषयी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असताना अजिंक्यतारा कारखान्याने शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे.


Back to top button
Don`t copy text!