दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२१ | सातारा | नॅशनल फेडरेशन न्यू दिल्ली, या राष्ट्रीय स्तरावरील केंद्रीय शिखर संस्थेकडून अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यास सन २०२०-२०२१ चा ‘हायस्ट शुगर रिकव्हरी इन हाय रिकव्हरी एरीया’ हा इफिशियन्सी पुरस्कार जाहीर झाला आहे. नॅशनल फेडरेशनकडून यापूर्वी सन २०१९-२० च्या हंगामाकरीता अजिंक्यतारा कारखान्यास ‘बेस्ट केन डेव्हलपमेंट इन हाय रिकव्हरी एरिया’ पुरस्कार प्राप्त झाला असून सलग दुसऱ्या वर्षी शिखर संस्थेचा पुरस्कार मिळाल्याने देशाच्या सहकार क्षेत्रात कारखान्याचा नावलौकिक द्विगुणित झाला आहे.
आतापर्यंत अजिंक्यतारा कारखान्यास कारखान्याची तांत्रिक गुणवत्ता, कार्यक्षमता व अत्युत्तम उत्पादन क्षमतेच्या आधारे देश व राज्यस्तरावरून एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सन २०२०-२१ व मागील सन २०१९-२०२० चा पुरस्कार वितरण सोहळा दि.१६ नोव्हेंबर २०२१ रोजी नवी दिल्ली येथे होणार आहे. नॅशनल फेडरेशनकडून कारखान्यास सलग दुस-याही वर्षी पारितोषिक प्राप्त झाले, ही बाब सर्वांसाठी अभिमानास्पद असून कारखान्याच्या वैभवामध्ये भर पाडणारी आहे, असे गौरवोद्गार कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
अजिंक्यतारा साखर कारखान्यास मिळालेल्या या पुरस्कारामध्ये संचालक मंडळ, सभासद, बिगर सभासद, सर्व ऊस पुरवठादार शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कामगार-कर्मचारी यांचा मोलाचा वाटा आहे. संचालक मंडळाकडून काटकसरीचे धोरण अवलंबून सभासदाभिमूख कारभार करण्यात येत असून पारदर्शक कारभार, उत्कृष्ट व काटेकोर आर्थिक नियोजन आणि सर्वांकडून मिळत असलेले बहुमोल सहकार्य यामुळे कारखाना प्रगतीपथावर नेण्यात यश मिळाले आहे. तालुक्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब महाराज यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झाले असून त्यांच्या आदर्श विचारसरणीला अनुसरून संचालक मंडळ नेहमीच कार्यरत राहील, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत म्हणाले की, आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या रूपाने कारखान्यास खंबीर व कुशूल नेतृत्व मिळाल्यामुळे कारखाना प्रगतीपथावर आहे आणि म्हणूनच कारखान्याची महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशपातळीवर सहकारातील आदर्श कारखाना म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले की, कारखान्याचे संचालक मंडळ नेहमीच सभासद व कामगार-कर्मचारी हिताचे निर्णय घेत असून संस्थेमध्ये काटकसरीच्या धोरणाबरोबरच मुल्यवर्धित उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत. नॅशनल फेडरेशन कडून मिळालेल्या इफिशियन्सी पुरस्कारामुळे कारखान्याच्या वैभवामध्ये भर पडली आहे. चालू गाळप हंगामामध्ये विक्रमी गाळप होणार असून, या हंगामात अतित्त्यूम साखर उतारा प्राप्त करण्याचा संचालक मंडळाचा मनोदय आहे. हा हंगाम कमीत कमी दिवसामध्ये यशस्वीपणे संपन्न करण्याबाबतचे नियोजन झाले असून कारखान्याकडे नोंद केलेला सर्वच्या सर्व ऊस आपल्याच कारखान्याकडे गळीतास द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.