अजिंक्यतारा कारखाना किफायतशीर दर देण्यासाठी कटिबद्ध – आ. शिवेंद्रसिंहराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२१ । सातारा । सातारा तालुक्यासह आसपासच्या परिसरातील शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण व्हावे या उदात्त हेतूने स्व. भाऊसाहेब महाराजांनी शेंद्रे येथील उजाड माळरानावर सहकार मंदिराची उभारणी केली. आज अजिंक्यतारा साखर कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम आहे. कारखान्याच्या प्रगतीत सभासद शेतकरी आणि कामगार, कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा आहे. होऊ घातलेल्या गळीत हंगामात कारखाना गाळपासाठी येणाऱ्या ऊसाला किफायतशीर दर देऊन उच्चतम दर देण्याची परंपरा कायम राखण्यास कटिबद्ध आहे, असे आश्वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याची ३९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर स्व. आमदार श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, सर्व संचालक, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सभापती सतीश चव्हाण, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, रविंद्र कदम, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. कांचन साळुंखे, पंचायत समितीचे उपसभापती अरविंद जाधव, सदस्य राहुल शिंदे, जितेंद्र सावंत, दयानंद उघडे, दादा शेळके, सतीश टिळेकर, प्रवीण शिंदे, गणपतराव शिंदे, किरण साबळे, अजिंक्यतारा सूट गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, संचालक अजित साळुंखे, रामचंद्र जगदाळे, सूर्यकांत धनावडे, धनंजय शेडगे, जयवंत कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, अनंत अडचणींवर मात करून हि संस्था आज सक्षम झालेली आहे. संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण आणि नेटके नियोजन करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख नेहमीच चढता ठेवला आहे. संचाल मंडळाला सभासद शेतकऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्यानेच आज हा कारखाना आर्थिकदृष्ट्या भक्कम झाला आहे. त्याचा फायदा ऊस पुरवठादार, सभासद शेतकऱ्यांना चांगला ऊसदर देण्यासाठी होत आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य दिले जात आहे.

कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्यात येत असून डिस्टलरीचेही विस्तारीकरण केले जाणार आहे. केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून न राहता उपपदार्थांच्या उत्पादनात वाढ करून कारखाना आणखी सक्षम केला जाईल. गळीत हंगामात उच्चतम दर देण्यासाठी कारखाना कटिबद्ध असून त्यादृष्टीने काटेकोर आणि नेटके नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी सभासदांनी आपला ऊस पुरवून नेहमीप्रने सहकार्य करून हाही हंगाम यशस्वी करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

अजेंड्यावरील सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात सर्वानुमते मंजुरी दिली. उच्चांकी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी अहवाल वाचन केले. संचालक नितीन पाटील यांनी आभार मानले. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांमुळे सभेला मोजक्या सभासदांची उपस्थिती होती तर, हजारो सभासद ऑनलाईन पद्धतीने हजर होते.


Back to top button
Don`t copy text!