स्थैर्य, सातारा, दि.१५: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य फळ मिळालं पाहिजे. त्यांच्या ऊसाला उच्चतम दर मिळाला पाहिजे हे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न अजिंक्यतारा कारखान्याने सत्यात उतरवले आहे. कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान नेहमीच उंचावत ठेवण्यासाठी अजिंक्यतारा कारखाना कटिबद्ध आहे, असे आश्वासक प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगामाची सांगता कारखाना स्थळावर आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते अंतिम ५ साखर पोत्यांचे पूजन करून करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन सर्जेराव दिनकरराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास रामचंद्र शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई व कारखान्याचे खातेप्रमुख आदी मोजके मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टींग पाळण्यात आले.
यंदाच्या २०२०-२१ च्या गळीत हंगामात १८३ दिवसांमध्ये सरासरी १६०.१८ टक्के गाळप क्षमतेचा वापर करून एकूण ७,३१,६७० मे.टन ऊसाचे गाळप होवून सरासरी १२.८२ टक्के साखर उताऱ्याने ८,७२,६६० क्विंटल साखर उत्पादित झाली व ऊसाचे सरासरी हेक्टरी उत्पादन १०० मे. टन निघालेले आहे. या हंगामात निघालेला सरासरी साखर उतारा १२.८२ टक्के इतका असून हा साखर उतारा सातारा जिल्हयामध्ये सर्वाधिक साखर उतारा आहे. तसेच या हंगामात एकूण ७,३१,६७० मे टन झालेले गाळप अजिंक्यतारा कारखान्याच्या इतिहासातील सर्वाधिक व उच्चांकी गाळप आहे.
गळीत हंगाम उत्कृष्टरित्या व यशस्वी पणे पार पाडण्यासाठी सर्व सभासद, बिगर सभासद, संचालक मंडळ, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगून आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. गळीत हंगाम नियोजनबध्द व यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने व कार्यकारी संचालक श्री. संजीव देसाई यांनी अत्यंत नियोजन बध्द कार्यक्रम आखून गळीत हंगाम यशस्वीपणे संपन्न केला आहे. गळीत हंगाम हा वैशिष्ठपूर्ण संपन्न झाला असून कारखान्याच्या आता पर्यंत झालेल्या प्रत्येक वर्षीच्या गाळपापेक्षा यंदाचे गाळप विक्रमी झाले असून सरासरी साखर उतारा हा जिल्हयामध्ये सर्वाधिक साखर उतारा आहे. शासन निर्धारित सुत्रानुसार ऊसाची एफआरपी प्रति मे.टन रूपये ३०४३/- निघालेली असून यापैकी चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला दर १० दिवसाचे कालावधीचे प्रति मे.टन रूपये २६००/- प्रमाणे पहिली उचल दिली असून दर १० दिवसाचे पेमेंट करणारा अजिंक्यतारा कारखाना हा राज्यात पहिलाच कारखाना असून याचा संचालक मंडळाला सार्थ अभिमान आहे, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
सद्या राज्यात कोरोना साथीची गंभीर परिस्थिती असल्याने राज्यात ऑक्सिजनची कमतरता मोठया प्रमाणावर भासत असून या नैसर्गिक आपत्तीचेवेळी सामाजिक योगदान देणे आवश्यक असल्याने अशावेळी राष्ट्रीय कार्यात आपलाही सहभाग असणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब विचारात घेवून ऑक्सिजन निर्मीती करिता अजिंक्यतारा कारखाना स्थळावर नवीन ऑक्सिजन निर्मीती प्लँटची उभारणी करण्याचे काम सुरु असून मे २०२१ अखेर या प्लँटचे काम पूर्ण होईल व त्यासाठी लागणाऱ्या मशिनरीची ऑर्डर सुध्दा दिली असल्याचे त्यांनी सांगितले. गाळप हंगामात कारखान्याचे सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यानी ऊस पुरवून गळीत हंगाम यशस्वी पणे संपन्न करण्यास केलेल्या सहकाराबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संचालक मंडळाच्या वतीनेसर्वांचे आभार मानले.