
दैनिक स्थैर्य । 20 जुलै 2025 । सातारा । महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्हा पालकमंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याला देश पातळीवरील साखर उद्योगाशी सलग्न असलेल्या भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेचा सर्वोत्कृष्ठ साखर कारखाना (बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स शुगर मिल) हा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून कोल्हापूर येथे झालेल्या शानदार सोहळ्यात नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज, नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते आणि भारतीय शुगरचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी संग्रामसिंह शिंदे, रणधिर शिंदे आदि मान्यवरांच्या उपस्थित रोख बक्षीस 1 लाख रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन कारखान्याला गौरविण्यात आले.
कार्यक्रमात मिळालेल्या पुरस्काराबद्दल मान्यवरांनी ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, कारखान्याचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ यांचे विशेष अभिनंदन केले. पुरस्कार स्विकारताना कारखानयाचे चेअरमन यशवंत साळुंखे, कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते, सर्व संचालक, अधिकारी, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांनी यावेळी सांगीतले की, कारखान्याने सुरुवाती पासूनच शेतकर्यांचे हित जोपासले आहे. तसेच शेतकर्यांना ऊसाचे पेमेंट वेळेत अदा करण्याची परंपरा राखलेली आहे. या बाबींचा विचार करुन भारतीय शुगर्स या नामांकित संस्थेने देश पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान केलेला आहे. कारखान्याचे कार्यकारी संचालक ना. शिवेंद्रसिंहराजे भोंसले, कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शन व सहकार्यामुळे सदर पुरस्कार प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार मिळण्यात कारखान्याचे सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक कंत्राटदार, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच हितचिंतक यांचे मोलाचे योगदान व सहकार्य लाभलेले आहे. कारखान्याच्या कार्याची दखल घेवून कारखान्याला आज अखेर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील 30 पुरस्कार मिळालेले आहेत. आजच्या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नावलौकीकात अधिक भर पडली असून कारखाना परिवारामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या पुरस्काराबद्दल ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सर्व पदाधिकारी व संचालक मंडळाने कारखान्याचे सर्व सभासद, बिगर सभासद, अधिकारी, कामगार-कर्मचारी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार व हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे.