
स्थैर्य, सातारा, दि. 13 सप्टेंबर : मराठा साम्राज्याची राजधानी असणार्या किल्ले अजिंक्यतारा आणि लगतच्या परिसराला पुन्हा झळाळी मिळणार आहे. किल्ल्याचा सर्व परिसर सौर उर्जेवर चालणार्या दिव्यांनी उजळणार आहे. याकरिता तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे पर्यटन मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
शंभूराज देसाई म्हणाले, किल्ले अजिंक्यतारा छत्रपती शिवराय तसेच शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली वास्तू आहे. मराठा साम्राज्याची चौथी राजधानी असणार्या किल्ले अजिंक्यताराच्या सुशोभिकरणासाठी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीतून निधी देण्यात आला होता. आता किल्ल्याचा सर्व परिसर सौरऊर्जेवर चालणार्या पथदिव्यांनी उजळणार आहे. याबाबतचा संपूर्ण आराखडा पर्यटन विभाग तयार करणार असून त्याला तातडीने निधी उपलब्ध करून दिला जाईल. हा परिसर खिंडवाडी आणि लिंब खिंडीतून ठळकपणे दिसावा हा यामागचा हेतू आहे. पूर्वीच्या काळात जसा होता, त्याच पद्धतीने किल्ले प्रतापगडच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. प्रतापगडावरील तळ्यांमध्ये नैसर्गिकरित्या झर्यांमधूनं पाणी कसे आणता येईल यासाठी काम करावे, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.
कोयनानगर येथील नऊ एकरमध्ये वसलेल्या जलसंपदा विभागाच्या नेहरू उद्यानाच्या सुशोभिकरणाचा प्रस्ताव आणि त्याचे सादरीकरण मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीपुढे करण्यात येऊन त्याच्या पहिल्या निधीचा टप्पा मंजूर करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. येथील पालकमंत्री कार्यालयात विविध विकासकामांचा आढावा घेतल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील,पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने,पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोम्मे, तहसीलदार अनंत गुरव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे इत्यादी उपस्थित होते.
कोयनानगरच्या नेहरू उद्यानाचा सुशोभिकरणासाठी निधी देणार
कोयनानगर येथील जलसंपदा विभागाचे नेहरू उद्यान नऊ एकर जागेत आहे. नेहरू उद्यानाच्या सुशोभिकरणासाठी जलसंपदा विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले जाईल आणि त्या आराखड्याला मान्यता देऊन तो आराखडा मुख्य सचिवांच्या उच्चस्तरीय समितीला सादर केला जाईल. या सुशोभिकरण कामासाठी पर्यटन विभाग व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे श्री. देसाई यांनी सांगितले. या बैठकीनंतर पालकमंत्री देसाई यांनी पाटण तालुक्यातील बोरगेवाडी पुनर्वसनाबाबत आढावा घेतला.