स्थैर्य, मुंबई , दि.21: भारतीय खेळाडू गुरुवारी ऑस्ट्रेलियामधून परतले. भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि ऋषभ पंतसह सर्वच खेळाडू मुंबई विमानतळावर पोहोचले. येथून रहाणे आपल्या मुलुंड येथील घरी पोहोचला. त्यांचे कुटुंब आणि शेजाऱ्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. रहाणेने विमानतळावर केक कापला. तसेच त्यांच्या घरी समर्थक आणि शेजाऱ्यांनी त्याच्यावर फुलांची उधळण करत ढोल-नगाड्यांसह त्याचे स्वागत केले.
BMC ने क्वारंटाइनमधून दिली सूट
रहाणेने आधी पत्नी आणि मुलीसोबत फोटो काढला आणि त्यानंतर त्याच्या शेजार्यांनी टिळा लावून त्याचे औक्षण केले. रहाणे ऑस्ट्रेलियाहून दुबईमार्गे मुंबईला पोहोचला आहे. महाराष्ट्र सरकारच्या गाईड लाईननुसार दुबईहून येणाऱ्या प्रत्येकाला 7 दिवसांसाठी हॉटेलमध्ये अलग ठेवणे आवश्यक आहे, परंतु भारतीय संघाचे खेळाडू खास विमानाने मुंबईला पोहोचले असल्याने BMCने त्यांना इंस्टीट्यूशनल क्वारंटाइनमधून सूट दिली आहे. यामुळेच अजिंक्य विमानतळावरून थेट त्याच्या घरी आला. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले की, खेळाडूंना पुढील 7 दिवस त्यांच्या घरात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय संघाने ब्रिस्बेनमध्ये पहिली टेस्ट जिंकून ऑस्ट्रेलियाला कसोटी मालिकेत मात देत इतिहास रचला आहे. नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्वाच्या रजेवर गेल्यानंतर रहाणेने कसोटी मालिकेतील संघाची कमान सांभाळली होती. यामुळे रहाणेच्या घरी याचा आनंद पाहायला मिळाला.
इंग्लंडच्या विरोधात लवकरच टी-20
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी, टी -20 आणि एक दिवसीय मालिकेत विजयासाठी संघाला आता आपल्या घरीच तयारी करावी लागणार आहे. रोहित शर्मा वगळता उर्वरित खेळाडू 5 महिन्यांनंतर मायदेशी परतत आहेत. 20 ऑगस्ट रोजी सर्व खेळाडू आयपीएलसाठी युएईला पोहोचले होते. येथून 12 ऑक्टोबर रोजी टीम ऑस्ट्रेलिया दौर्यावर रवाना झाली होती.
कसोटी कर्णधार म्हणून रहाणेचा विक्रम उत्कृष्ट होता
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणार्या अजिंक्य रहाणेने आतापर्यंत पाच कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. यापैकी चार विजयी झाले आहेत, तर एक सामना ड्रॉ झाला आहे. भारताने चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 ने जिंकली. यासह भारताने ऑस्ट्रेलियामध्ये सलग दुसऱ्यांदा कसोटी मालिका जिंकली आहे. विशेष म्हणजे एडिलेडमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात 36 धावांवर बाद झाल्यानंतर विराट कोहलीसह अनेक महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडियाने मालिकेत पुनरागमन केले.