स्थैर्य,पाटण, दि.२७ : पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटातील नगरसेवक अजय कवडे हेच दावेदार असल्याचे गुरुवारी (ता.26) स्पष्ट झाले आहे. दरम्यान उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पटाण नगरपंचायतींचे नगराध्यक्ष संजय चव्हाण आणि उपाध्यक्ष सचिन कुंभार यांनी आपल्या पदांचे राजीनामे नुकतेच दिल्याने या दोन्ही पदांसाठीच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जाहीर केला होता.
पाटणचे नगराध्यक्ष संजय चव्हाण आणि उपाध्यक्ष सचिन कुंभार यांनी पदाचा कार्यकाल संपल्याने नुकताच राजीनामा दिला आहे. पुढील सव्वा वर्षासाठी कोणाकडे नगरपंचायतीच्या चाव्या द्यायच्या यासाठी युवा नेते सत्यजिंतसिंह पाटणकर यांची चाचपणी सुरु केलेली होती. या पदासाठी नगरसेवक अजय कवडे, सचिन कुंभार, विजय (बापू) टोळे, सरस्वती खैरमोडे, संगीता चव्हाण, अनिता देवकांत, रश्मी राऊत यांची नावे चर्चेत होती.या पदासाठीच्या निवडीच्या कार्यक्रमानूसार सोमवारी (ता.23) नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस होता. त्याच दिवशी छाननी करण्यात आली. त्यानंतर अर्ज मागे घेण्याची मुदत गुरुवार (ता.26) होती. त्यानूसार नगरसेवक अजय कवडे यांनी भरलेला एकमेव अर्ज होता.
तहसीलदार बाई मानेंचा धडाका; वाळूचोरांकडून साडेचार कोटींचा दंड वसूल
आज शुक्रवार (ता.27) आवश्यकता भासल्यास नगराध्यक्षपदासाठी निवडणूक झाली असती परंतु अजय कवडे यांचा एकच अर्ज असल्याने त्यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. या निवडीनंतर उपाध्यक्षपदाची निवड होईल त्याबाबतची उत्सुकता निर्माण झालेली आहे.
हे असतील उपाध्यक्षपदाचे दावेदार
रामपूर विभागातील विजय टोळे, अनिता देवकांत, सरस्वती खैरमोडे यांच्या नावाची उपाध्यक्षपदासाठी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. दरम्यान नगराध्यक्षपद शहरातील अजय कवडे यांना दिल्याने आता पाटण शहर आणि रामपूर अशी पदांची विभागणी केल्यास उपाध्यक्षपद हे रामपूरला मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.