
स्थैर्य, फलटण, दि. ०७ ऑगस्ट : फलटण शहरातील गिरवी नाका परिसरात संशयास्पद स्थितीत विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवरून फिरणाऱ्या एका व्यक्तीला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची झडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक एअरगन आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, ही मोटारसायकल चोरीची असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार संदीप लोंढे हे दि. ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. यावेळी गिरवी नाक्यावर लॉ कॉलेजसमोर एक व्यक्ती काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकलसह संशयास्पदरित्या आढळून आला. त्या मोटारसायकलला पुढे व मागे नंबर प्लेट नव्हती. पोलिसांनी त्याला नाव व पत्ता विचारला असता, त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला पॅन्टमध्ये एक एअरगन पिस्तूल सापडले. पोलिसांनी ४० हजार रुपये किमतीची मोटारसायकल आणि एक हजार रुपये किमतीची एअरगन असा एकूण ४१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी अजय बाळू वाघमोडे (रा. तिर्वंदी, ता. माळशिरस) आणि त्याच्या एका अनोळखी साथीदाराविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पूनम बोबडे करत आहेत.