स्थैर्य, कोझीकोड, दि. 7 : केरळमधील एअर इंडियाचे विमान लँडिंग करताना धावपट्टीवरून घसरले. या विमानात 191 प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. दुबईहून हे विमान कालिकत येथे आले होते. विमानातील प्रवाशांना वाचण्यासाठी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. केरळमधील कोझीकोड येथील करिपूर विमानतळावर हे विमान लँडिंग करत होते. लँडिंगवेळी विमान धापट्टीवरून घसरले. धापवपट्टीवरून घसरत हे विमान दरीत कोसळले. या दुर्घटनेत विमानाचे दोन तुकडे झाले. यात विमानाच्या पायलट व को-पायलटसह 14 जणांचा मृत्यू झाला असून 123 जण जखमी तर 15 जण गंभीर जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
एअर इंडियाच्या दुबई-कोझीकोड (खद-1344) या विमानाला मोठा अपघात झाला आहे. या विमानात 4 क्रू मेंबर्स आणि 2 दोन पायलटसह 174 प्रवासी व 10 लहान बालके होती. ही दुर्घटना पावणे आठच्या सुमारास घडली. करिपूर विमानतळावर उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्याने विमानाला मोठा अपघात झाला.
विमान उतरत असताना ते धावपट्टीवरून घसरले आणि दरीत कोसळले. यामुळे विमानाचे दोन तुकडे झाले आहेत, अशी माहिती डीजीसीएने दिली. या प्रकरणी डीजीसीएने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत तर मदत आणि बचावकार्यासाठी एनडीआरफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही माहिती दिली. मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. घटनास्थळी गोंधळाचे वातावरण आहे. विमानाच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना करीपूर विमानतळावर सायंकाळी 7.45 वाजता घडली. एअर इंडिया एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार दोन विमान चालकांसह सहा क्रू मेंबर्स विमानात होते. विमान अपघातग्रस्त झाले, तेव्हा त्यात 174 प्रवासी होते. विमान अपघातात जखमी झालेल्या अनेक प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही मदत आणि बचावकार्यात आवश्यक त्या व्यवस्था करण्याचे आदेश पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाला आदेश दिले आहे.
सदर घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना मोदी यांनी फोन करून अपघाताबाबतची व सध्याच्या घडीला काय स्थिती आहे याची माहिती घेतली.