शाहू कलामंदिरात ध्वनिक्षेपकासह वातानुकूलित यंत्रणा बंद


दैनिक स्थैर्य । 25 मे 2025। सातारा। येथील शाहू कलामंदिरात मोठ्या प्रमाणात असुविधा असून, त्याचा फटका कलाकारांसह कलाप्रेमींना बसत आहे. बंद ध्वनिक्षेपक आणि बंद वातानुकूलित यंत्रणेमुळे कलाकारांसह प्रेक्षक घामाघूम होत आहेत. प्राथमिक आणि अत्यावश्यक असणार्‍या या यंत्रणांच्या देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. या दुर्लक्षामुळे याठिकाणी असुविधांचा प्रयोग भरत आहे. दुर्लक्ष, अनास्थेची नकारघंटा बंद करत पालिकेने याठिकाणी सुविधांची तिसरी घंटा वाजवणे आवश्यक आहे.

नावाजलेल्या अनेक कलाकारांचे सातार्‍यातील शाहू कलामंदिरात प्रयोग सादर करण्यास प्राधान्य असते. त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौर्‍यात सातार्‍याचा समावेश हमखास असतो. प्रयोगासाठीची आवश्यक ती जुळणी झाल्यानंतर कलाकार येथे दाखल होतात. मात्र, मेकअप रूम, विंगामधील अस्वच्छतेचा सामना त्यांना सर्वप्रथम करावा लागतो.

मध्यंतरीच्या काळात पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च करत शाहू कलामंदिराचे नूतनीकरण केले. संपूर्ण थिएटर वातानुकूलित करत आवश्यक त्या सर्व अद्ययावत यंत्रणांची उभारणी केली. रंगरंगोटी, नवीन बैठक व्यवस्थेसह इतरसुविधांच्या उभारणीमुळे शाहू कलामंदिराच्या नावलौकिकात भर पडली. काही महिन्यांतच येथील वातानुकूलित यंत्रणा तसेच ध्वनिक्षेपकाची संपूर्ण एक बाजू बंद पडली. या बंद पडलेल्या यंत्रणा अद्यापही तशाच असून, त्याचा त्रास कलाकारांसह प्रेक्षकांना प्रयोगावेळी सहन करावा लागतो. वातानुकूलित यंत्रणा व ध्वनिक्षेपक यंत्रणा हाताळण्यासाठीचे कुशल मनुष्यबळ शाहू कलामंदिर येथे उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे प्रयोगावेळी यंत्रणांची बटणे चालू करत अर्धकुशल कामगार त्यांचे कर्तव्य पार पाडतात. आतमधील वातावरण नियंत्रित होतेय का, ध्वनिक्षेपण व्यवस्थित होतेय का, याचे कोणतेही सोयरसुतक या कर्मचार्‍यांना नसल्याचे दिसून येते.

नुकत्याच झालेल्या एका प्रयोगासाठी ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे हे शाहू कलामंदिर येथे गेले होते. असुविधा, अस्वच्छता, बंद वातानुकूलित यंत्रणा व इतर बाबींमुळे त्यांनी त्याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली. पालिकेच्या प्रसिद्धीसाठी नेमलेल्या अ‍ॅण्ड अ‍ॅम्बेसिडरनेच याबाबत नाराजी व्यक्त केल्याने येथील ठेकेदार, त्यांचे कर्मचारी, ते करत असलेल्या कामाविषयी शंका उत्पन्न होत आहे.


Back to top button
Don`t copy text!