एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी स्वीकारला वायुदल प्रमुखाचा पदभार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२१ । नवी दिल्ली । महाराष्ट्राचे सुपुत्र एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे.

एअर चीफ मार्शल आर.के.एस.भदौरिया वायुदल प्रमुख पदावरुन सेवानिवृत्त झाले असून एअर चीफ मार्शल विवेक चौधरी यांनी त्यांच्याकडून पदाची सूत्र स्वीकारली.

एअर चीफ मार्शल विवेक चौधरी हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याच्या हस्तरा येथील आहेत. त्यांनी नांदेड येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले व पुढे पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले. 29 डिसेंबर 1982 रोजी ते वायुसेनेच्या फायटर स्ट्रीममध्ये रूजू झाले.

त्यांनी यापूर्वी वायुदलाचे उपप्रमुख तसेच वायुदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर इन चीफ म्हणून कार्य केले आहे. वायुदलात त्यांनी कमांड, स्टाफ आणि निर्देशात्मक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. ‘मिग’ आणि ‘सुखोई’ ही लढाऊ विमाने उडविण्याचा ३८०० तासांचा त्यांना अनुभव आहे. वायुदलाने राबविलेल्या सियाचीन येथील ‘ऑपरेशन मेघदूत’ आणि कारगिल युद्धातील ‘ऑपरेशन सफेद सागर’ या मोहिमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. वायुदालातील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी 2004 मध्ये वायुदल पदक, विशिष्ट पदक, २०१५ मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक आणि २०२१ मध्ये परम विशिष्ट सेवा पदकाने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!