छोट्या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुविधा पूर्ण करण्यासाठी मदतीचा हातभार लावावा : जेष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ


दैनिक स्थैर्य । दि. १६ ऑगस्ट २०२२ । फलटण । भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शिक्षण व्यवस्थेच्या बळकटीसाठी जगदीश करवा यांच्या सारख्या तरुण उद्योजकांनी पुढे येऊन शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या छोट्या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी मदतीचा हातभार लावावा, अशी अपेक्षा महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ यांनी व्यक्त केली.

महात्मा एज्युकेशन सोसायटी येथील वॉटर फिल्टर कुलरचा शुभारंभ करताना सौ.मयुरी करवा व जगदीश करवा. सोबत रवींद्र बेडकिहाळ, रवींद्र बर्गे, पी.बी.भोसले, सौ.अलका बेडकिहाळ, वैशाली मंजरतकर, मनीष निंबाळकर, भिवा जगताप, अरुण खरात.

येथील महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या चतुराबाई शिंदे बालक मंदिर,श्रीराम विद्या भवन प्राथमिक शाळा, आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय यांचा संयुक्तरित्या ध्वजारोहण कार्यक्रम युवा उद्योजक जगदीश करवा व सौ.मयुरी करवा यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. त्यावेळी बेडकिहाळ बोलत होते.

कार्यक्रमास भारतीय सैन्य दलातील जवान अमोल जगताप, प्राथमिक शालेय समितीचे चेअरमन रविंद्र बर्गे, माध्यमिक शालेय समिती चेअरमन सौ.अलका बेडकिहाळ, ज्येष्ठ सदस्य शांताराम आवटे, भारद्वाज बेडकिहाळ, जायंट्स ग्रुपचे पी. बी. भोसले, लायन्स क्लबच्या सौ.सुनंदा भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

बेडकीहाळ यांनी यावेळी गेल्या २५ वर्षाचा संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन कोणाचेही मोठे आर्थिक पाठबळ नसताना समाजाच्या व मित्र परिवाराच्या सहकार्यावर या शिक्षण संस्थेचे कार्य सुरू आहे. संस्थेमध्ये समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था व शिक्षक सातत्याने प्रयत्नशील असतात. परंतु समाजाने देखील आपल्या उत्पन्नाचा काही भाग शैक्षणिक कार्यासाठी दिला तर शिक्षणसंस्था सक्षम होतील व विद्यार्थ्यांना अधिक उत्तम दर्जाचे शिक्षण देता येईल, असेही मत बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

जवान अमोल जगताप यांनी आपल्या सेवेतील काही शौर्याचे प्रसंग विद्यार्थ्यांना सांगत राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती बाबत मार्गदर्शन केले.

जगदीश करवा यांनी आपले वडील स्वर्गीय रामविलास करवा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्वरा बिल्डर्स व डेव्हलपर्स च्या माध्यमातून महात्मा एज्युकेशन सोसायटीच्या तिन्ही शाखांना कुलर प्रणालीद्वारे शुद्ध पाण्याची व्यवस्था करून दिली आहे. त्याचे उद्घाटन जगदीश करवा व सौ.मयुरी करवा यांच्या हस्ते करण्यात आले. या सहकार्याबद्दल करवा दाम्पत्याचा संस्थेच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना जगदीश करवा यांनी, संस्थेच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा देऊन भविष्यातही या तिन्ही शाखांना आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे नमूद केले.

सर्व प्रमुख अतिथींचे स्वागत बालवाडीच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली मंजरतकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मनीष निंबाळकर व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक भिवा जगताप यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, ध्वजगीत, ध्वजवंदन गीताने करण्यात आली. याप्रसंगी विद्यार्थ्यांची देशभक्तीपर भाषणे झाली.

स्वातंत्र्याच्याअमृत महोत्सवा निमित्त शाळा स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ तसेच या तीनही विभागांना शैक्षणिक कार्यात मदत करणाऱ्या सर्व संस्था व व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हेमलता गुंजवटे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!