
स्थैर्य, बारामती, दि. ७ ऑक्टोबर : तालुक्यातील अहिल्यानगर (पणदरे) येथे जय तुळजाभवानी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने गेल्या १४ वर्षांपासून शारदीय नवरात्रोत्सव ‘वाचन संस्कृती’ने साजरा केला जात आहे. उत्सवाच्या काळात व्याख्यानमालेचे आयोजन करून समाजप्रबोधन आणि जनजागृती करण्याची परंपरा मंडळाने जोपासली आहे.
या नवरात्रोत्सवात केवळ धार्मिक कार्यक्रमांवर भर न देता, विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये व्याख्याने, भारूड, सांस्कृतिक कलागुण दर्शन, योगासने, मैदानी खेळ, भजन, ज्येष्ठ नागरिक कौतुक सोहळा, गुणवंत विद्यार्थी सन्मान आणि विधवा माता पूजन यांसारख्या कार्यक्रमांचा समावेश असतो. मंडळाकडून वाढदिवसही केक न कापता फळे कापून, वृक्षारोपण करून किंवा ग्रंथवाटप करून साजरा केला जातो. विशेष म्हणजे, हे सर्व दर्जेदार कार्यक्रम कोणत्याही प्रकारची वर्गणी न मागता, केवळ स्वेच्छेने दिलेल्या लोकवर्गणीतून आयोजित केले जातात.
मंडळ स्थानिक जिल्हा परिषद शाळेच्या उपक्रमांनाही प्रोत्साहन देते. शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना शालेयोपयोगी साहित्यांचे बक्षीस स्वरूपात वाटप केले जाते.
मंडळाचे अध्यक्ष, ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे यांच्यासह नंदकुमार जाधव, आबासो कोकरे, बापूराव कोकरे, सचिन कोकरे, डॉ. नितीन कोकरे यांच्यासह सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थ हा उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतात.