
दैनिक स्थैर्य । दि. १९ जुन २०२५ । वडले । तालुक्यातील वडले या ठिकाणी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या दिमाखात करण्यात आले होते. वडले या ठिकाणी जयंती उत्सव मोठ्या दिमाखदार समारंभामध्ये संपन्न झाला आहे.
शुक्रवार दि. 13 जून रोजी “धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर – एक युग” हा मराठी चित्रपट दिग्विजय एकळ यांच्या माध्यमातून मोफत प्रदर्शित करण्यात आला होता.
शनिवार दि. 14 जून रोजी वक्तृत्व स्पर्धा व त्यानंतर झी टॉकीज फेम ज्ञानेश्वरी यादव यांचे किर्तन फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. सदरील कीर्तनाला ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थिती दर्शवत कीर्तन सोहळा संपन्न झाला; त्याच दिवशी सायंकाळी जय भवानी हायस्कूल तिरकवाडीचे प्राचार्य ज्ञानेश्वर काळे यांच्या माध्यमातून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार दि. 15 जून रोजी सकाळी ९ वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम व त्यानंतर रक्तदान शिबिर संपन्न झाले. यासोबतच सायंकाळी ७ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार समारंभ संपन्न झाले. त्यानंतर प्रसिद्ध निवेदक चंद्रकांत कोकाटे यांचा “होम मिनिस्टर; खेळ पैठणीचा” कार्यक्रम गावातील महिलांसाठी आयोजित करण्यात आला होता.
सोमवार दि. 16 जून रोजी वडले गावामधून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संपन्न झाली आहे.
वडले गावातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित समारंभास माजी आमदार दिपकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभली तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे मोलाचे सहकार्य जयंती उत्सवात लाभले आहे.