धुळदेवमध्ये शेतीपंप चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्रीत दोन सख्ख्या भावांच्या विहिरींमधील सुमारे ५० हजारांच्या मोटारी लांबवल्या


फलटण तालुक्यातील धुळदेव येथे पुणे-पंढरपूर महामार्गालगत असलेल्या शेतातील दोन विहिरींमधून तब्बल ४८ हजार ८२० रुपये किमतीच्या दोन शेतीपंप मोटारी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 21 मार्च : फलटण शहर आणि तालुक्यात सध्या भुरट्या चोऱ्यांचे आणि वाहन चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, आता चोरट्यांनी आपला मोर्चा थेट शेतकऱ्यांच्या शेतीपंपांकडे (पाण्याच्या मोटारींकडे) वळवला आहे. फलटण तालुक्यातील धुळदेव येथे पुणे-पंढरपूर महामार्गालगत असलेल्या शेतातील दोन वेगवेगळ्या विहिरींमधून तब्बल ४८ हजार ८२० रुपये किमतीच्या दोन शेतीपंप मोटारी अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्रीत लांबवल्याची अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

या शेतीपंप चोरीप्रकरणी फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रमोद हरिभाऊ अब्दागिरे (वय ५४ वर्षे, व्यवसाय शेती, रा. धुळदेव, ता. फलटण) यांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे.

फलटण शहर पोलीस स्टेशनने दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी प्रमोद अब्दागिरे आणि त्यांचा सख्खा भाऊ प्रवीण अब्दागिरे यांची धुळदेव गावच्या हद्दीत पुणे-पंढरपूर महामार्गालगत शेती आहे. दिनांक १६ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास प्रमोद यांचे वडील हरिभाऊ आणि आई जयश्री हे शेताला पाणी देत होते, त्यावेळी विहिरीतील मोटार चालू अवस्थेत होती. पाणी दिल्यानंतर ते नेहमीप्रमाणे घरी निघून गेले.

दुसऱ्या दिवशी, म्हणजे १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास प्रमोद अब्दागिरे हे शेताला पाणी देण्यासाठी आणि मोटार चालू करण्यासाठी विहिरीजवळ गेले. त्यावेळी त्यांना विहिरीत मोटार दिसली नाही. त्यांनी बारकाईने पाहिले असता, मोटारीला बांधलेल्या दोन रश्श्या आणि केबल तोडलेल्या अवस्थेत आढळून आल्या. त्यांनी तत्काळ आजूबाजूला शोधाशोध केली, मात्र मोटार कुठेही सापडली नाही.

त्यानंतर त्यांना शंका आल्याने त्यांनी थोड्या अंतरावर असलेल्या आपला भाऊ प्रवीण अब्दागिरे याच्या विहिरीत जाऊन पाहिले असता, तिथेही तोच प्रकार घडलेला दिसला. प्रवीण याच्या विहिरीतील मोटारीच्याही रश्श्या आणि केबल तोडून अज्ञात चोरट्यांनी तीही मोटार चोरून नेली होती. एकाच रात्रीत दोन्ही भावांच्या विहिरींमधील मोटारी गायब झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

चोरीला गेलेल्या मोटारी ‘पीएम कुसुम योजने’च्या!

चोरीला गेलेल्या या दोन्ही मोटारी ‘पंतप्रधान कुसुम योजने’अंतर्गत (PM Kusum Yojana) मिळालेल्या होत्या. या दोन्ही मोटारी सीआरआय (CRI) कंपनीच्या ‘मॉडेल SLO5D – 5HP 4 Stage’ क्षमतेच्या होत्या. एका मोटारीची किंमत २४ हजार ४१० रुपये असून, अशा एकूण ४८ हजार ८२० रुपये किमतीच्या या दोन पाणबुडी मोटारी होत्या.

या प्रकरणी प्रमोद अब्दागिरे यांच्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा कडक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने शेतातील पिकांना पाण्याची नितांत गरज असतानाच अज्ञात चोरट्यांनी थेट पाण्याच्या मोटारीच चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, परिसरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!