कापसाच्या बिजी-२ वाणांची दरवाढ न करण्याची विनंती केंद्र शासनाला करणार – कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.०८: केंद्र शासनाने यावर्षी अधिसूचना जारी करून बिजी-2 वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती केंद्र शासनाला करणार असल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. कापूस बियाण्यांची वाहतुक सुरळीत व्हावी यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश देतानाच राज्यातील बीटी कापसाचे क्षेत्र मोठे असल्याचे लक्षात घेऊन बोंडअळी नियंत्रणाबरोबरच कापूस पिकासाठी ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना रूजवण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी यावेळी केले.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात श्री.भुसे यांच्या अध्यक्षतेखाली बीटी कापूस बियाणे पुरवठा व त्याच्या दराच्या अनुषंगाने बैठक झाली. यावेळी कृषि सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, कृषि विभागाचे अधिकारी व बियाणे उत्पादक व संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी कृषीमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले, केंद्र शासनाने यावर्षी अधिसूचना जारी करून बिजी-2 वाणांचे दर वाढविले आहेत. या वाणांची दरवाढ करू नये अशी विनंती केंद्र शासनाला करणार आहोत. राज्यात गेल्या दोन तीन वर्षापासून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव लक्षात घेता कृषी विभाग व कापूस बियाणे कंपन्यांनी जिल्हानिहाय समन्वय ठेवून बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोहीम स्वरूपात काम करावे, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हानिहाय व कंपनीनिहाय बोंडअळी नियंत्रण मोहीम आयोजित करीत असतांना ‘एक गाव एक वाण’ या संकल्पनेवर भर द्यावा, त्यातून मिळणाऱ्या कापूस गाठी ह्या एकसारख्या असतात, त्यांचे जीनींग करणे सोपे होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव बाजारभाव मिळण्यास मदत होते. त्यामुळे बोंडअळी नियंत्रणाबरोबरच ‘एक गाव एक वाण’ ही संकल्पना रूजवण्यासाठी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन श्री. भुसे यांनी केले.

खरीप हंगामात एकूण वहितीखालील क्षेत्रापैकी कापूस हे राज्याचे महत्त्वाचे नगदी पिक असून मोठ्या प्रमाणावरील क्षेत्र या पिकाखाली असल्याने कृषी विभागाने विशेष पुढाकार घेऊन या पिकातील अद्ययावत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करावा. मुल्यसाखळी विकसीत करण्यावर भर देण्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

राज्यभरात व राष्ट्रीय पातळीवर कापूस पिकाची वेचणी सुलभ होणेकरीता वेगवेगळी यंत्रे विकसित होत असून त्याची यशस्वीता तपासावी. त्याचबरोबर गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी “मेटींग डिस्ट्रप्शन” तंत्रज्ञानाचा देखील सविस्तर अभ्यास कृषि विद्यापीठांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!