कृषी संजीवनी मोहिमेत ४० हजार गावांमध्ये ६ लाख शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन – कृषिमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० जून २०२१ । मुंबई । शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी कृषी संजीवनी मोहीम राबविण्यात आली. दि.1 जुलै रोजी कृषी दिनी या मोहिमेचा समारोप करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेच्या समारोपासोबत पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. 21 जूनपासून सुरु झालेल्या या मोहिमेत सुमारे 40 हजार गावांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सुमारे 6 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.

दररोज एक विषय घेऊन संपूर्ण राज्यभर कृषी अधिकारी, शास्त्रज्ञ, कृषी मित्र यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. दरवर्षी कृषी दिनाचे औचित्य साधून दि.1 जुलैपासून ही मोहीम राबविली जाते. मात्र तोपर्यंत खरीप पिकांचा पेरणी आणि जमीन मशागतीचा कालावधी सुरु झालेला असतो. ही बाब लक्षात घेऊन 1 जुलैपूर्वी ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 21 जूनपासून राज्यात कृषी संजीवनी मोहिमेस प्रारंभ झाला.

मोहिमेच्या पहिल्या दिवशी बीबीएफ लागवड तंत्रज्ञानाविषयी 5 हजार 564 गावांमध्ये कार्यक्रम झाला. त्यामध्ये 84 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. बीजप्रक्रिया तंत्रज्ञानाविषयी 5 हजार 671 गावांमध्ये कार्यक्रम घेऊन 88 हजार 727 शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 5 हजार 457 गावांमध्ये जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर करणे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये 88 हजार 670 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. एक गाव एक कापूस वाण, सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, ऊस लागवड तंत्रज्ञान, कडधान्य व तेल बीया क्षेत्रात आंतरपिक तंत्रज्ञानाबाबत 4 हजार 699 गावांमध्ये कार्यक्रम घेण्यात आला. त्या माध्यमातून 78 हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. विकेल ते पिकेल, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञानाचा प्रसार, रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचा पिक उत्पादक वाढीसाठी सहभाग, प्रत्येक जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची किड व रोग नियंत्रण उपाययोजनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी दिनी या मोहिमेचा समारोप होत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार केला जाणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम आणि फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत. दुपारी 12.30 वाजता सह्याद्री अतिथीगृह येथे हा कार्यक्रम होणार असून कृषी विभागाच्या युट्यूब चॅनलवरुन प्रसारण होणार असल्याचे कृषी संचालक विकास पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!