
फलटण कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांनी दुधेबावी येथे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक दिले. फवारणीचे द्रावण कसे बनवावे आणि काय काळजी घ्यावी, याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
स्थैर्य, दुधेबावी, दि. ०५ जानेवारी : शेतीमध्ये पिकांवर पडणाऱ्या रोगांचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करणे क्रमप्राप्त असते. मात्र, अनेकदा चुकीच्या पद्धतीने औषध मिसळल्याने किंवा फवारणी केल्याने अपेक्षित परिणाम मिळत नाही, उलट नुकसान होण्याची भीती असते. हीच बाब ओळखून फलटण येथील कृषी महाविद्यालयाच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी (कृषीदूत) दुधेबावी (ता. फलटण) येथे शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणीचे शास्त्रशुद्ध प्रात्यक्षिक दिले.
यावेळी कृषीदुतांनी रोगांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकांची निवड आणि वापर कसा करावा, यावर प्रकाश टाकला. विशेषतः फवारणीचे द्रावण (Solution) तयार करताना घ्यावयाच्या काळजीबद्दल त्यांनी शेतकऱ्यांना सावध केले.
कृषीदुतांनी माहिती देताना सांगितले की, “अनेक शेतकरी थेट फवारणीच्या पंपात कीटकनाशक ओततात, जे चुकीचे आहे. योग्य पद्धत म्हणजे, प्रथम एका प्लास्टिकच्या बादलीत आवश्यक प्रमाणात पाणी घेऊन त्यात शिफारशीनुसार कीटकनाशक मिसळून ते लाकडी काठीने चांगले ढवळावे. त्यानंतर हे तयार द्रावण पंपात भरावे.” यामुळे औषध पाण्यामध्ये एकसारखे मिसळले जाते आणि फवारणीचा रिझल्ट चांगला मिळतो. तसेच फवारणीची वेळ (सकाळ किंवा सायंकाळ) आणि हवेची दिशा लक्षात घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
हा उपक्रम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण आणि उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. यासाठी कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा. एन. ए. पंडित आणि ए.आय.ए. प्रमुख डॉ. जी. बी. अडसूळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषीदूत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, श्रीराम मोहिते, झहीर मनेरी आणि प्रणव साळुंखे यांनी केले होते. उपस्थित शेतकऱ्यांनी या मार्गदर्शनाबद्दल समाधान व्यक्त केले.

