कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू होऊ देणार नाही, साताऱ्यात ‘स्वाभिमानी’ आक्रमक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य,सातारा,दि ५ : केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक महाराष्ट्रात लागू करू नये, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सातारा-कोरेगाव रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात रास्ता रोको आंदोलन केले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, अर्जुन साळुंखे, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, संजय जाधव, ऍड. विजय चव्हाण, ऍड. सतीश कदम, राजू घाडगे व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

श्री. शेळके म्हणाले, “शेतकऱ्यांना अस्थिर करणाऱ्या केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकाला विरोध करण्यासाठी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांत मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशभरातील 250 हून अधिक शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेल्या आहेत. महाराष्ट्रातही हे विधेयक लागू करू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळण्याची आवश्‍यकता आहे.

तसेच एपीएमसी बाहेर विक्री झाल्यास बाजार शुल्क न मिळाल्याने राज्याचे नुकसान होणार आहे. किमान आधारभूत किमतीची यंत्रणा मोडकळीस येणार आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नसून पूर्णपणे तोट्याचे आहे. त्यामुळे विधेयकाला विरोध करण्यासाठी रास्ता रोको करण्यात आला असून, केंद्र सरकारने तत्काळ विधेयक मागे न घेतल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.”


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!