शेतीसाठी वरदान! पूरनियंत्रण व पाणी साठवणुकीच्या ‘त्या’ तंत्रज्ञानाला पेटंट; राज्यातील ५ संशोधकांचे यश


शेतीमध्ये पूरनियंत्रण आणि पाणी साठवण्यासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाला भारतीय पेटंट मिळाले आहे. सातारा आणि तासगाव येथील संशोधकांचे हे मोठे यश आहे. वाचा हे तंत्रज्ञान कसे काम करते.

स्थैर्य, सातारा, दि. ०४ डिसेंबर : कृषी क्षेत्रातील पूरनियंत्रण, मृदा-संवर्धन आणि पावसाच्या पाण्याचे नियोजन करणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या संशोधनाला भारतीय पेटंट कार्यालयाने अधिकृत मान्यता दिली आहे. “पीव्हीसी शीटसह चर (Trench) खोदून पूर आणि जमिनीची धूप रोखण्याची पद्धत आणि प्रणाली” (Method and System for Preservation and Harvesting in Trench Lined with PVC Sheet to Prevent Flood and Soil Erosion) या विषयावरील संशोधनासाठी हा बहुमान मिळाला असून, हे तंत्रज्ञान ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे.

राज्यातील ५ संशोधकांचे संयुक्त यश

या महत्त्वपूर्ण संशोधनात महाराष्ट्रातील पाच संशोधकांनी संयुक्तपणे कार्य केले आहे. यामध्ये खालील संशोधकांचा समावेश आहे:

  • डॉ. विशाल सर्जेराव घोलप: सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, छत्रपती शिवाजी महाविद्यालय, सातारा.

  • डॉ. अर्जुन शिवाजी वाघ: सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख, भूगोल विभाग, पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव.

  • डॉ. राणी श्रीरंग शिंदे: सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख, अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, पाचवड.

  • डॉ. सुनील सोमा गवित: सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, तासगाव महाविद्यालय.

  • डॉ. मोहन अर्जुन वसावे: सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, के. चौधरी आर्ट्स, एसजी पटेल कॉमर्स आणि बाबाजी बीजे पटेल सायन्स कॉलेज, तलोदा (जि. नंदुरबार).

काय आहे हे तंत्रज्ञान?

हे तंत्रज्ञान प्रामुख्याने जीपीएस (GPS) प्रणालीवर आधारित आहे. यामध्ये शेताच्या समोच्च रेषांनुसार (Contour Lines) चर (Trench) खोदले जातात. या चरांमध्ये जाड पीव्हीसी (PVC) शीटचे अस्तर बसवले जाते. यामुळे पावसाचे अतिरिक्त पाणी जमिनीत न मुरता किंवा वाहून न जाता ते भूमिगत टाक्यांमध्ये साठवणे शक्य होते. या पद्धतीमुळे पाझर आणि गळती (Leakage) टाळली जाते, ज्यामुळे वर्षभर सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते. पूरनियंत्रणासोबतच जमिनीची धूप थांबवण्यासाठी ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरणार आहे.

सातारा कॉलेजसाठी अभिमानास्पद क्षण

हे पेटंट छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या भूगोल विभागासाठी पहिलेच पेटंट ठरले आहे. या यसाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, उपप्राचार्य डॉ. रामराजे माने देशमुख, प्रा. डॉ. अनिलकुमार वावरे आणि विभागप्रमुख डॉ. आर. आर. साळुंखे यांनी सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे. शैक्षणिक समुदाय आणि स्थानिक पातळीवर या संशोधनाचे मोठे कौतुक होत आहे.


Back to top button
Don`t copy text!