
दैनिक स्थैर्य । 28 जून 2025 । सातारा । जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे जिल्ह्यातील सेंद्रिय शेती, फुले, फळे व दुग्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्या 19 शेतकर्यांना कृषी पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये चार महिला शेतकर्यांचा समावेश आहे. कृपी दिनी मंगळवारी (दि. 1) सकाळी 11 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वित्तरण करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी गजानन ननावरे यांनी दिली.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस राज्यात कृषी दिन म्हणून साजरा होतो. या दिवशी जिल्हा परिषदेच्यावतीने विविध पुरस्कार देऊन शेतकर्यांचा गौरव करण्यात येतो. विविध तालुक्यांतील कर्तबगार, नावीन्यपूर्ण उपक्रम व पर्यावरणपूरक काम करणार्या शेतकर्यांचा सन्मान यावेळी केला जाणार आहे. शेतकर्यांनी केलेले नवीन प्रयोग, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, नैसर्गिक,
सेंद्रिय शेतीतील योगदान व शाश्वत शेती पध्दतीला प्रोत्साहन देणे हा या पुरस्कारामागचा उद्देश आहे. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत. डॉ. जे. के. बसू सेंद्रिय शेती पुरस्कार प्रदीप कोंडोबा शेलार (रा. कोयनानगर, सोनारवाडी ता. पारण) प्रथम, सुरेश सीताराम बोराटे (रा. बिदाल ता. माण) द्वितीय, अमोल भानुदास भोसले (रा. एकसळ, ता. कोरेगाव) तृतीय, अशोक ज्ञानोबा
जाधव (रा. चिचनेर निंब, ता. सातारा) व संदीप जयवंत चव्हाण रा. असवली (ता. खंडाळा) उत्तेजनार्थ. कै. यशवंतराव चव्हाण फलोत्पादन शेती पुरस्कार बबन रामचंद्र मुळीक (रा. सासकल ता. फलटण) प्रथम, महेंद्र देवराव धुमाळ (रा. धुमाळवाडी ता. फलटण) द्वितीय, उत्तम विनायक गाडे (रा. आसनगाव, ता. कोरेगाव) व बाळकृष्ण उत्तम बंडगर (रा. होलेवाडी, ता. कोरेगाव) यांना तृत्तीय क्रमांक विभागून तर शंकर बाळू जाधव (रा. भाटमरळी, ता. सातारा) उत्तेजनार्थ, कै. यशवंतराव चव्हाण पुष्पोत्पादन शेती पुरस्कार- सचिन रमेश शेलार (रा. म्हसवे, ता. सातारा) प्रथम, अजित दिनकर पाटील (रा. मांडवे, ता. खटाव) द्वितीय, संजय जगन्नाथ पवार (रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) तृतीय क्रमांक. कै. यशवंतराव चव्हाण दुग्धोत्पादन शेती पुरस्कार- शिवम भरत जाधव (रा. पुसेगाव, ता. खटाव) व दीपाली संदीप भागवत (रा. कण्हेरी, ता. खंडाळा) प्रथम क्रमांक विभागून, स्वाती विजयकुमार पवार (रा. मुंजवडी, ता. फलटण) व मनीषा संदीप पवार (रा. राजाळे, ता. फलटण) यांना द्वितीय क्रमांक विभागून तर मानसी चैतन्य कणसे (रा. शेणोली, ता. कराड) व गणपत श्रीपती सपकाळ (रा. चोरांबे, ता. जावळी) यांना तृतीय क्रमांक विभागून.
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांच्यासह खातेप्रमुखांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहवे, असे आवाहन श्री. ननावरे यांनी केले आहे.