‘स्मार्ट’ प्रकल्पांतर्गत प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसीत करण्यासाठी अमेरिकेच्या कृषी विभागासोबत करार – कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. १६: अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून राज्यात मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून त्या माध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषि विभाग यांच्यात राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेविड रांझ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

महाराष्ट्र आणि अमेरिकेच्या कृषी विभागात परस्पर तांत्रिक सहकार्यासाठी हा सामंजस्य करार झाला. कृषीमंत्री श्री.भुसे यावेळी म्हणाले की, या कराराच्या माध्यमातून कृषी क्षेत्राचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी धोरण राबविण्यासाठी टाकण्यात आलेले महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेनुसार राज्यात “विकेल ते पिकेल” अभियानाच्या माध्यमातून बाजाराभिमुख पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करतानाच त्या शेतमालासाठी निश्चित अशी बाजार व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे.

त्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळ्या विकसित करण्यात येणार आहे. याकामी अमेरिकेचा कृषी विभाग तांत्रिक सहकार्य करणार आहे. या कराराच्या माध्यमातून राज्याच्या कृषी विभागाची क्षमताबांधणी करण्यात येईल. कृषी पणन, बाजार माहिती आदी बाबींमध्ये क्षमताबांधणीसाठी काम केले जाईल, असेही कृषीमंत्र्यांनी सांगितले.

अमेरिकेचे वाणिज्य दूत डेविड रांझ म्हणाले की, आज करण्यात आलेला सामंजस्य करार हा महत्वाकांक्षी असून अमेरिकेच्या कृषी विभागाचा भारतातील राज्य सरकार सोबतचा पहिला करार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामाध्यमातून द्विपक्षीय क्षमताबांधणी करण्यात येईल. अमेरिकेचे कृषि क्षेत्रात मोलाचे योगदान असून जागतिक अन्नसुरक्षा आणि कापूस तसेच इंधनाची वाढती मागणी या क्षेत्रात संयुक्तरित्या काम करण्यास फार मोठा वाव असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अमेरिकेच्या वाणीज्यदूतातील कृषी तज्‍ज्ञ लॅझारो सँडवाल, ध्रुव सूद, श्रीमती सुमेधा रायकर-म्हात्रे, कृषी विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर, अतिरिक्त प्रकल्प संचालक दशरथ तांभाळे, सहसचिव श्रीकांत आंडगे आदी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!