दैनिक स्थैर्य | दि. २९ ऑक्टोबर २०२१ | सातारा | जागे व्हा, जागे व्हा, जिल्हाधिकारी जागे व्हा, आमची कामे करा नाही तर खुर्ची खाली करा, अशा घोषणा देत सत्ता ब प्रकार हटविण्यात यावे, अशी मागणी सदर बझार येथील ज्येष्ठ नागरिकांनी करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुसऱ्यावेळी आंदोलन करत या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सत्ता प्रकार ‘ब’ मुळे जागा नावावर होत नाही, त्यामुळे सत्ता प्रकार ब कायमचा हटविण्यात यावे, यासाठी त्रस्त ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.अनेकवेळा मागणी करुनही सत्ता प्रकार ‘ब’ हटविण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून विलंब होत असून जागा मालकांचे वय 70 ते 75 च्या पुढे गेले आहे, याचा गांभीर्याने विचार करत ते तत्काळ हटविण्यात यावा, या विषयाबाबत दुसऱ्यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी शासनाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत विविध घोषणा देत आंदोलन केले.
या आंदोलनाच्या संदर्भात माहिती देताना माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे म्हणाले, “महाराष्ट्र शासनाने मार्च 2019 मध्ये ज्यांच्या जमीनी वर्ग २ मध्ये आहेत त्यांच्या जमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी अधिमुल्य जमिनीची रक्कम भरल्यानंतर त्या जमिनी त्या व्यक्तीच्या नावावर होतील, असा आदेश काढण्यात आला असून या आदेशाची अंतिम मुदत ही मार्च 2022 पर्यंत आहे. सत्ता ब हटविण्याबाबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन जिल्हाधिकारी यांच्या टेबलवर आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना अनेकदा विनंती केली आहे. या फाईलवर सही करा पण जिल्हाधिकारी यांना या फाईलवर सही करण्यास वेळ मिळत नाही तर निवासी उपजिल्हाधिकारी नुसतेच आश्वासन देत आहेत. त्यातच त्यांच्या नावावर असणाऱ्या जमिनी त्यांच्या मुलांच्या नावावर करायचे म्हटले तर त्यांना देता येत नाही. गेल्या सहा महिन्यापासून या फाईली का थांबल्या आहेत ते आता महालक्ष्मीलाच माहिती, आता ती पावली तरच सही होईल असे वाटायला लागले आहे. ‘ब’ सत्ता आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास आम्ही सर्वजण जलसमाधी घेणार आहोत. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी सदरची प्रॉपर्टी आपल्या नावावर करुन घ्यावे, अशा संतप्त प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केल्या.