स्थैर्य, सातारा, दि. २० : वाघ्या मुरळी लोककलावंतांना उदरनिर्वाहासाठी विशेष निधी किंवा अनुदान द्यावे या मागणीसाठी वाघ्या मुरळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालून अनोखे आंदोलन केले.
यावेळी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लोककलावंतांच्या मुला मुलींच्या शिक्षणाचा खर्च शासनाने करावा, शांताबाई नोंदणी करून या लोककलेला मान्यता द्यावी, शासनाने कलावंतांना जमीन देऊन घरकुल योजना मंजूर करावी तसेच वाघ्या मुरळी ला कायमस्वरूपी पेन्शन सुरु करावी अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आले आहेत.
वाघ्या मुरळी हे लोक कलावंत कलेच्या माध्यमातून धर्मजागरण, कुलधर्म, कुलाचार पालन तसेच समाज प्रबोधनाद्वारे समाजसेवेचे काम करत आहेत. सध्या या लोककलावंता समोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. लॉक डाउन काळात जागरण गोंधळ कार्यक्रम होत नसल्याने उत्पन्नावर मर्यादा आली असून या कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी अविनाश पवार, प्रमोद शिंदे, बाळासाहेब मोहिते, पुरुषोत्तम घोरपडे, दत्ता शिंदे, प्रदीप पवार, सोमनाथ शिंदे आदींची उपस्थिती होती.