
दैनिक स्थैर्य । दि.०८ मार्च २०२२ । सातारा । ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत, या मुख्य मागणीसाठी जिल्हा ओबीसी संघटनेच्यावतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भरत लोकरे, सुनीता दीक्षित, विजय सपकाळ, सुरेश पवार, भाऊ दळवी, बापु काशिद, श्रिकांत आंबेकर, संजय परदेशी, प्रताप साळुंखे, प्रमोद क्षीरसागर, संजय पोतदार आदी उपस्थित होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांनी ‘आमची मागणी मान्य करा, आमची संख्या निश्चित करा’ अशा प्रकारचे फलक घेऊन घोषणाबाजी केली.
याबाबत, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. गेली काही महिन्यापूर्वी राज्यात १०५ नगरपंचायत व अकोला, वाशिम, भंडारा, पालघर, नंदुरबार, नागर्पूर या जिल्हा परिषदेतील पोटनिवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्याने या प्रवर्गावर मोठा अन्याय झाला आहे. ७३ व ७४ च्या घटनादुरुस्तीने आरक्षण मिळाले आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारने कोर्टात योग्य पध्दतीने मांडणी न केल्याने राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली आहे. याचबरोबर बारा बलुतेदार समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकासमहामंडळ स्थापन करणे, एसबीसी’चे आरक्षण ५० टक्यांच्या आत बसविणे, महाज्योती या संस्थेला ओबीसी लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देणे यासह ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा ईशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.