
दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सातारा । तब्बल दोन वर्षाच्या करोनाच्या कालखंडानंतर बुधवारी सातारा जिल्ह्यातील प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी पहिला दिवसाचा आनंद द्विगुणित केला. गुरुजनांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि गोड खाऊ देऊन स्वागत केले.
सातारा जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात 83 शाळा असून या विविध शाळांमधून सरकारी आणि खाजगी अशा दोन्ही क्षेत्रातून तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेले दोन वर्षे करोनाच्या संक्रमणामुळे फारच अडचणीची ठरली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घ्यावे लागले तर जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये गुरुजनांना विद्यार्थ्यांना अध्यापन करताना फारच अडचणींचा सामना करावा लागला होता. पटसंख्या अगदीच घटल्याने काही अडचणी जाणवल्या होत्या. मात्र, यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिल्या दिवशी सातारा जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार विद्यार्थ्यांनी शाळेत पहिल्या दिवशी उपस्थिती नोंदवण्याचे वृत्त आहे.
सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या निर्देशानुसार आणि प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांनी सूचना दिल्या प्रमाणे सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करून शाळा वेगवेगळ्या माध्यमातून सजवण्यात आल्या आणि विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी गोडी वाटेल असे वातावरण तयार करण्यात आले होते.
सातारा तालुक्यातील बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कोरेगाव, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, कराड या विविध ठिकाणी विद्यार्थ्यांना वाजत गाजत शाळेत आणण्यात आले. पहिल्या दिवशी पूर्ण शाळा न ठेवता अर्धवेळ शाळा चालवण्यात आल्या. मात्र, पहिला दिवस गुरुजनांची ओळख मित्र-मैत्रिणींची ओळख त्याच बरोबर मिष्ठान्न अशा विविध माध्यमातून विद्यार्थ्यांचा दिवस संस्मरणीय करण्यात आला. सातारा शहरातही कन्या शाळा आनंद इंग्लिश स्कूल श्रीपतराव पाटील हायस्कूल करंजे येथे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कन्या शाळेमध्ये विद्यार्थिनींसाठी चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे उपप्राचार्य चंद्रकांत ढाणे यांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन बघून विद्यार्थिनी हरसल या शाळेच्या मुख्याध्यापिका अनुराधा दौंडे यांनी त्यांचे स्वागत केले.