स्थैर्य, दि.३: गेल्या दोन महिन्यांत हरभऱ्याच्या किमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली. ३२ टक्क्यांहून अधिक उसळी घेत हाजिर आणि वायदे दोन्ही किमती ५,५०० रु. प्रतिक्विंटलवर गेल्या. हा गेल्या तीन वर्षांतील सर्वोच्च स्तर आहे. याआधी सप्टेंबर २०१७ मध्ये हरभऱ्याचा भाव ५६७६ रु. प्रतिक्विंटल होता. तज्ञांनुसार, आगामी पेरणीतील विलंब आणि सणात मागणीतील तेजीमुळे हरभऱ्याच्या किमतीत आगामी काळात वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत हरभऱ्याच्या किमती ५,८०० रु. क्विंटलपर्यंत पोहोचू शकतात. कमोडिटी एक्स्चेंजमध्ये (एनसीडीएक्स) गुरुवारी हरभऱ्याच्या ऑक्टोबर पुरवठ्याच्या वायद्याची किंमत ५,५७० रु. प्रतिक्विंटलची पातळी स्पर्श केली. जुलै २०२० मध्ये हरभऱ्याचा भाव एनसीडीएक्सवर ४१०५ रु. प्रतिक्विंटल होता. याच पद्धतीने दोन महिन्यांत १,४०० रु. प्रतिक्विंटलपेक्षा जास्तीची तेजी आली आहे. दुसरीकडे, हाजिर बाजारात हरभऱ्याची घाऊक किंमत ५,६०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचली आहे. दिल्लीच्या लॉरेन्स रोड बाजारात गुुरुवारी राजस्थानचा हरभरा ५,५०० रु. प्रतिक्विंटल होता. महाराष्ट्रात अकोला बाजारपेठेत हरभरा ५,६००-५,६५० रु. प्रतिक्विंटल आणि इंदूरमध्ये ५,४५०-५,५०० रु. प्रतिक्विंटल होता. कृषी मंत्रालयाने जारी पीक वर्ष २०१९-२०(जुलै-जून)च्या चौथ्या अग्रीम उत्पादन अंदाजानुसार, देशात ११३.५ लाख टन हरभऱ्याचे उत्पादन झाले.
हरभरा उत्पादनात ४०.९% हिस्सेदारीसह मध्य प्रदेश प्रथम
कृषी आणि प्रक्रिया खाद्य उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणानुसार (एपीडा) एकूण हरभरा उत्पादनात ४०.९३% हिस्सेदारीसह मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर १५.८४% हिस्सेदारीसह महाराष्ट्र आणि १४.८६% हिस्सेदारीसह राजस्थान तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, यूपी, गुजरात आणि छत्तीसगड सहाव्या, सातव्या आणि आठव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे एकूण हरभरा उत्पादन अनुक्रमे ५.१६%, ३.२९% आणि २.८५% आहे.
सणामुळे दोन महिने तेजी राहील
लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणल्यानंतर हरभऱ्याची औद्योगिक मागणी वाढली आहे. आगामी दिवसांत सणातील मागणीही वाढेल. यामुळे दोन महिने हरभऱ्याच्या किमतीत तेजी राहण्याची शक्यता आहे. सरकारने हरभऱ्याच्या किमतीवरील नियंत्रणात लक्ष दिले पाहिजे. – अजय केडिया, एमडी, केडिया अॅडव्हायझरी, मुंबई
हरभऱ्याच्या किमतीत तेजी येण्यामागची प्रमुख कारणे
1. हरभऱ्याचा भाव विविध कडधान्यात सर्वात कमी आहे. कोरोना काळात भाज्या महागल्याने हरभऱ्याच्या मागणीत वाढ झाली आहे.
2. सरकार गरिबांना दरमहा एक किलो हरभरा देत आहे. यामुळे बफर स्टॉकमधून ९.७० लाख टन हरभरा निघण्याची आशा आहे.
3. सणात डाळ व बेसन पिठाची मागणी पूर्ण करण्यासाठी कारखान्यातील खरेदीत तेजी आहे.
4. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील जमिनीत आर्द्रता जास्त आहे. यामुळे पुढील पिकाच्या पेरणीत विलंब होत आहे.
5. मागील पीक वर्षात ८५ लाख टन हरभरा झाला. हा अपेक्षेपेक्षा कमी होता.त्यामुळे किमती वाढत आहेत.