मुंबईवरील वीजसंकटामागे घातपात?; ऊर्जामंत्र्यांचे खळबळजनक ट्वीट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.१४: ‘ मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा ठप्प होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही’, असे खळबळजनक ट्वीट ऊर्जामंत्री डॉ. नितीन राउत यांनी केले आहे. सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातील वीजपुरवठा ठप्प झाला होता. त्यानंतर युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम करण्यात आले. साडेतीन तासांनंतर टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोमवारी अभूतपूर्व असा वीजगोंधळ पाहायला मिळाला. सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुंबई, ठाणे, नवी मुंबई या भागातील वीज पुरवठा अचानक ठप्प झाला. त्याचा वीज पुरवठ्यावर विसंबून असलेल्या सर्वच सेवांना फटका बसला. मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱ्या विशेष लोकल ठप्प झाल्या. प्रवाशांवर ट्रॅकवर उतरून पायपीट करण्याची वेळ आली. दुसरीकडे रुग्णालयांमध्येही काही प्रमाणात गोंधळ उडाला. अनेक ठिकाणी जनरेटरचा आधार घ्यावा लागला. मुलुंडमधील अॅपेक्स रुग्णालयात जनरेटरने पेट घेतल्याने आगीचा भडका उडाला. तिथून अन्य रुग्णालयांत हलवण्यात आलेल्या एका रुग्णाला प्राणास मुकावे लागले. वीज संकटाचा पाणी पुरवठ्यालाही फटका बसला. आज मुंबई व ठाण्यात अनेक भागांत कमी दाबाने पाणी पुरवठा झाला.

अचानक कोसळलेल्या वीज संकटाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. सर्वप्रथम वीजपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देतानाच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचेही आदेश दिले. एकीकडे साधारण साडेतीन तासानंतर एकेका भागातील वीज पुरवठा पूर्ववत होत असतानाच दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी उच्चस्तरिय बैठक घेतली. या बैठकीत संबंधितांकडून घटनेची विस्तृत माहिती घेण्यात आली व हे संकट नेमके कसे कोसळले यावर सखोल चर्चा करण्यात आली. शासन स्तरावर या घटनेच्या सगळ्या बाजू तपासल्या जात असतानाच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या ट्वीटमुळे या घटनेला वेगळेच वळण लागले आहेत. खुद्द राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनीच यामागे घातपाताची शक्यता असल्याची भीती व्यक्त केल्याने नेमकं काय घडलं, हा नवा प्रश्न उभा ठाकला आहे.

दरम्यान, मुंबईवर कोसळलेल्या वीज संकटानंतर भाजपच्या नेत्यांनी आक्रमक होत सरकारला धारेवर धरले होते. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी १५ मिनिटांत हा बिघाड दुरुस्त होणे अपेक्षित होते, असे म्हणत सरकारच्या कारभारावर टीका केली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणी दोषींची तातडीने चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!