विधानसभेच्या घवघवीत यशानंतर आता मिशन नगरपालिका; रणजितदादा ऍक्टिव्ह मोडवर


दैनिक स्थैर्य । 05 जुलै 2025 । फलटण । माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी ऍक्टिव्ह मोडवर आले असल्याचे दिसून येत आहे. येणाऱ्या काही महिन्यांमध्ये रखडलेल्या नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचा कालबद्ध कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिका ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली असल्याचे दिसून येत आहे.

विधानसभेनंतर बुलेट ट्रेनच्या स्पीडने रणजितसिंह यांची कामगिरी …..

गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर सुद्धा अवघ्या काही महिन्यांमध्ये झालेली विधानसभा निवडणूक ताकतीने लढवून विधानसभा निवडणुकीमध्ये राजे गटाच्या तीस वर्षाच्या सत्तेला छेद देत आपल्या विचाराचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये भाजपा नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना यश आलेले असल्याचे आपल्याला दिसून आले आहे.

रणजितदादा जेव्हा माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून गेले होते, तेव्हा त्यांना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघासह माढा लोकसभा मतदारसंघातील अन्य पाच मतदारसंघांमध्ये सुद्धा लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे त्या वेळेला ते फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हते. परंतु लोकसभेला पराभव झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणूक ताकतीने लढवून विधानसभेमध्ये सचिन सुधाकर पाटील यांना महायुतीच्या माध्यमातून त्यांनी निवडून आणलेले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सचिन सुधाकर पाटील यांना महायुतीच्या माध्यमातून निवडून आणल्यानंतर फलटण शहरासह तालुक्यामध्ये त्यांनी विकासकामांचा धडाका लावला असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सुद्धा फलटण शहरासह तालुक्याच्या प्रलंबित विकास कामांना फोकस करून टीकाटिप्पणी टाळून विकासात्मक कामकाज पुढे घेऊन जात असताना आपल्याला बघायला मिळत आहे.

आता लक्ष नगरपालिका व पंचायत समितीच …..

येणाऱ्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्थात नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यामध्ये गत तीस वर्षांपासून राजे गटाचे वर्चस्व हे स्थानिक स्वराज्य संस्थांवर राहिलेले होते. आता विधानसभेच्या निवडणुकीच्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत राजे गटातील अनेक दिग्गज नेते सोबत आले असल्याने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीचा झेंडा फडकला जाईल, अशा चर्चा सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये रंगू लागलेल्या आहेत.

राजे गटाची भूमिका गुलदस्त्यात …..

सातारा जिल्ह्याचे नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करीत आहेत तर त्यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांना रामराम करत पवार साहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी कडून माजी आमदार दिपक चव्हाण यांना उमेदवारी देत विधानसभेला चांगली झुंज सुद्धा त्यांनी दिलेली होती.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राजे गटाची अर्थात श्रीमंत रामराजे श्रीमंत संजीवराजे व श्रीमंत रघुनाथराजे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर कोणतीही भूमिका जाहीररीत्या स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे तालुक्यातील जनतेला सुद्धा राजे गट येणारी निवडणूक ही अजितदादांसोबत की पवार साहेबांच्या सोबत अथवा अन्य कोणता पर्याय निवडणार आहेत ? याबाबत त्यांची भूमिका गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!