दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । सातारा । जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार शशिकांत शिंदे एका मताने पराभूत झाले. या निवडणुकीत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्याच काही मातब्बर नेत्यांनी श्री. शिंदेना पराभूत करण्यासाठी अपक्ष उमेदवार ज्ञानदेव रांजणे यांना ताकद दिल्याचा आरोप करून शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर दगडफेक केली. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत जावळी सोसायटी मतदारसंघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे व अपक्ष ज्ञानदेव रांजणे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे रांजणे कट्टर समर्थक आहेत. या निवडणुकीत सहकार पॅनल मधील काही नेत्यांनी शशिकांत शिंदे यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला आहे. या निवडणुकीत शशिकांत शिंदेना विजयी करा, असा निरोप खुद्द शरद पवार व अजित पवार त्यांनी जिल्ह्यातील मातब्बर श्रेष्ठींनी पाठविला होता. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांचाही निरोप प्रमाण न मानता शशिकांत शिंदे यांना पाडण्याचे काम राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी केल्याचा आरोप शिंदे समर्थकांनी केला. हा पराभव आपल्याच लोकांनी केल्याचे सांगत सुमारे 15 ते 20 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनावर तुफान दगडफेक केली.