स्थैर्य, कऱ्हाड. दि.१२ : येथील छत्रपती शिवाजी भाजी मंडईबाहेरील रस्ता अडवून बसलेल्या 11 विक्रेत्यांचे हातगाडे पालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईमध्ये जप्त केले. त्यामुळे मंडईत अस्ताव्यस्तपणावर मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कारवाईचा बडगा उचलला खरा मात्र विक्रेत्यांनी दिवाळीनंतर त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केल्याने मोहीम थांबवण्यात आली. या वेळी किरकोळ वाद झाला. मात्र, दिवाळीनंतरचा तोडगा सर्वमान्य झाल्याने मोहीम थांबवली.
रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी भाजी मंडईतच बसावे, अशा सूचना मात्र या वेळी मुख्याधिकारी डाके यांनी दिल्या. त्यानुसार रस्त्यावरील विक्रेत्यांना मंडईत बसवण्यात आले. या वेळी फौजदार भरत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त होता. या वेळी किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले. पालिकेने पोलिस बंदोबस्तात अतिक्रमणे काढण्याचा निर्णय घेतल्याने मंडईतील विक्रेत्यांमध्ये गोंधळ उडाला.
मुख्याधिकारी डाके, आरोग्य निरीक्षक मिलिंद शिंदे व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. भाजी मंडई व्यतिरिक्त मंडईबाहेर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई होणार होती. मंडईपासून पालिकेच्या दारात, येथील प्रभात चित्रपटगृहाबाहेर मंडईचा विळखा आहे. भाजी विक्रेते थेट न्यायालयापर्यंतही बसतात. मंडईचे नियोजन बिघडल्यामुळे अनेकदा तक्रारी होत आहेत. पालिकेने विक्रेत्यांना मंडईतच भाजीविक्रीसाठी बसावे अशा पालिकेने सूचना केल्या होत्या, तरीही भाजी विक्रेते बाहेरच विक्रीसाठी बसत होते. यामुळे रस्त्यावर कोंडी होत होती. वाहने मंडईत परिसरात येऊच शकत नव्हती. त्याची पालिकेकडे तक्रार होती. त्या तक्रारीच दखल घेत मुख्याधिकारी डाके यांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यांनी भाजी विक्रेत्यांना मंडईत बसण्याच्या सूचना केल्या. पालिकेपासून ते सोमेश्वर मंदिर, तसेच भाजीमंडईला विळखा घालून अस्ताव्यस्त बसणाऱ्या विक्रेत्यांना योग्य जागा देऊन रस्त्यासाठी जागा सोडण्याच्या सूचना केल्या. या वेळी अतिक्रमणात असणारे 11 हातगाडे व साहित्य पालिकेने उचलले. त्यात वाद झाला.
या वेळी मुख्याधिकारी डाके मंडईत आले. त्यांनी विक्रेत्यांना पालिकेत जाऊन चर्चा करूया, असे सांगितल्यावर काही विक्रेत्यांसह पालिकेत बैठक झाली. विक्रेत्यांनी दिवाळी, दसरा सणांसाठी बाहेरून येणाऱ्या विक्रेत्यांची संख्या जास्त असल्याने गर्दी झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दिवाळीनंतर मोहीम राबवावी, अशी भूमिका विक्रेत्यांनी घेतली. भाजी व्यापार संघटनेचे अध्यक्ष साबिरमिया मुल्ला, विक्रेत्यांनी रस्त्यावरील विक्रेत्यांना मंडईत बसण्यास सांगितले. त्यामुळे कारवाई थंडावली.