
स्थैर्य, सातारा, दि.५ : कोविडचे संक्रमण रोखण्याच्या अनुषंगाने पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, लॉकडाउन शिथिल केल्यानंतर आता जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून उर्वरित क्षेत्रातील पर्यटनस्थळे काही अटी-शर्तींवर खुली करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे महाबळेश्वर, पाचगणीसह कोयनानगरचे पर्यटन तब्बल सात महिन्यांनी बहरणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी ही माहिती दिली.
कोरोना संसर्गाचा धोका रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व पर्यटनस्थळे बंद केली होती. त्यामुळे येथील व्यावसायिकांसह नागरिकांचे हाल होत होते. तब्बल सात महिने लॉकडाउनच्या फेऱ्यात अडकलेल्या पर्यटनस्थळांवरील व्यावसायिकांनी मध्यंतरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पर्यटनस्थळे सुरू करण्याची मागणी केली होती. कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली नव्हती. लॉकडाउन अंशतः शिथिल होत असताना काही व्यवहार सुरू करण्यास सुरवात झाली आहे. आता जिल्ह्यातील पर्यटनस्थळेही सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल सात महिन्यांनंतर महाबळेश्वर, पाचगणीसह कोयनानगरचे पर्यटन बहरेल. पर्यटनस्थळावर येणाऱ्यांसाठी काही अटी-शर्ती लागू करण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये पर्यटनस्थळांना भेटी देणाऱ्या पर्यटकांना सामाजिक अंतर राखणे बंधनकारक असून, रांग पद्धतीचा अवलंब करावा लागणार आहे. त्यासाठी एक मीटर अंतरावर खुणा करून घ्याव्या लागतील. ज्या विभागाच्या अखत्यारित पर्यटनस्थळे आहेत, त्या विभागाने पर्यटनस्थळांवर गर्दी होणार नाही, यासाठीचे काटेकोरपणे नियोजन करायचे आहे. त्यासाठी स्वतंत्ररीत्या एन्ट्री व एक्झिट पॉइंट स्थापन करावेत, पर्यटनस्थळांच्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची प्रवेशद्वाराजवळ आरोग्य तपासणी करावी, पर्यटकाचे तापमान, ऑक्सिजन पातळी तपासावी, प्रत्येक पर्यटकाचे नाव, पत्ता, वय, तापमान, ऑक्सिजन पातळी, इतर आजार, मागील 14 दिवसांच्या प्रवासाची माहितीची नोंद रजिस्टरमध्ये करावी, शारीरिक तापमान जास्त अथवा ऑक्सिजन पातळी कमी असल्यास संबंधित व्यक्तीस रुग्णालयात जाण्यास सांगावे.
तसेच कोविडसदृश्य लक्षणे असणाऱ्या पर्यटकाला प्रतिबंध करून रुग्णालयात दाखल करावे, सर्व पर्यटकांसह कर्मचारी, गाईड यांनी मास्क, ग्लोव्हज, फेस शिल्ड, सॅनिटायझर व सुरक्षा साधनांचा वापर करणे बंधनकारक असेल. सहली अथवा मोठ्या समूहांना (ग्रुप) पर्यटनस्थळाच्या ठिकाणी भेट देण्यास मनाई असेल. पर्यटनस्थळावर ज्या- ज्या ठिकाणी नागरिकांचा स्पर्श होण्याची शक्यता आहे, अशी सर्व ठिकाणे वारंवार निर्जंतुक करावीत, अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुद्ध साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा श्री. शिंदे यांनी दिला आहे.