
स्थैर्य, मुंबई, दि.२४: भारतातील दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टच्या ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यानंतर स्वत: अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोज यांनी मनसेच्या ई-मेलची दखल घेत अॅमेझॉन अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्याची मान्यता दिली. यानंतर आता फ्लिपकार्टनेही ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करण्यास मान्यता दिली आहे.
अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग अॅपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी मनसेने 15 ऑक्टोबरला संबंधित कंपन्यांच्या मुंबईतील ऑफिसला धडक दिली होती. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांच्या बीकेसीमधील ऑफिसमध्ये जाऊन मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता. मनसेच्या खळ्ळ खट्याकच्या इशाऱ्यानंतर अॅमेझॉन यूएसएचे प्रतिनिधी आणि मनसे चिटणीस अखिल चित्रे यांच्यात बीकेसी कार्यालयात एक व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. त्यानंतर अॅमेझॉन मराठी भाषेचा समावेश करण्यासाठी तयार झाली.