स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील पूर्व भागातील आसू गावात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता आरोग्य विभागाने कोरोना व्यक्तीच्या संपर्कातील व 17 जणांना क्वारंटाईन केलेले आहे. तर नऊ जणांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल केलेले आहे. आसू तालुका फलटण येथील 22 वर्षीय महिलेला कोरोनाची व सारीची लक्षणे आढळून आली असून तिचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. प्रशासकीय यंत्रणेने आसूतील तो भाग सील केला असून आसू गावात पान टपरीवर टपरी वजा किराणा दुकाने बंद करण्याचे आदेश असताना उघडीच आहेत. सायंकाळी पानपट्टी व मोजकी किराणा दुकाने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनात येत आहे. कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर शासनाने नवीन कमिटी तयार केली असून त्या कमिटीमध्ये मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील तसेच बीट अंमलदार यांचा समावेश आहे. आसू ग्रामपंचायतीचे कोरोना दक्षता कमिटीचे काम महत्त्वपूर्ण आहे.